विशेष प्रतिनिधी
मुंबई: “देशाचे पवित्र संविधान आणि लोकशाही व्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांचे सहकारी एका धोकादायक आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग बनले आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून सरकार बदलणे म्हणजे लोकशाही; परंतु विरोधक आज ‘गव्हर्नमेंट चेंज’ नव्हे तर ‘रेजिम चेंज’ची भाषा करत आहेत. ‘रेजिम चेंज’चा खरा अर्थ केवळ सत्तांतर नसून देशाची राज्यघटना बदलणे, लोकशाहीची संपूर्ण चौकट उद्ध्वस्त करणे आणि स्वायत्त संस्थांना वेठीस धरणे हा आहे. उद्धव ठाकरेंसह विरोधक ज्या ‘रेजिम चेंज’चा जप करत आहेत, तो मनसुबा आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही संविधानाला हात लावू देणार नाही,” असा एल्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पुकारला.
मुंबईत भाजप-महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ महामोर्चाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आणीबाणीकालीन इतिहासाची लक्तरे वेशीवर टांगतानाच शेजारील देशांमधील घडामोडींचा दाखला देत विरोधकांवर घणाघाती वार केले.
गव्हर्नमेंट चेंज विरुद्ध रेजिम चेंज; विरोधकांना शब्दांचा अर्थ तरी ठाऊक आहे का?
‘रेजिम चेंज’ या संकल्पनेचा खरा अर्थ आणि त्यामागील षडयंत्र उलगडताना मुख्यमंत्री म्हणाले, “लोकशाहीमध्ये जनतेच्या मतांच्या बळावर एका पक्षाचे सरकार जाऊन दुसऱ्या पक्षाचे सरकार येणे (गव्हर्नमेंट चेंज) हा प्रत्येकाचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र काँग्रेस आणि त्यांचे सहकारी रोज उठून ‘रेजिम चेंज’चा जो नारा देत आहेत, तो अत्यंत विषारी आहे.”
संविधान व संस्था बदलण्याचा डाव
“‘रेजिम चेंज’ म्हणजे संपूर्ण राजकीय व्यवस्था बदलणे, देशाचे मूळ संविधान बदलणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या केलेल्या स्वायत्त संस्थांचे अस्तित्व संपवणे. ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसवाले पत्रकार परिषदांमध्ये ज्या अविर्भावात ही भाषा वापरतात, त्यावरून या नेत्यांना ‘रेजिम चेंज’चा नेमका आणि भयानक अर्थ तरी ठाऊक आहे का, असा सवाल पडतो.”
बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेचा दाखला
शेजारील राष्ट्रांमधील राजकीय उलथापालथींचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी जनतेला सावध केले. “बांगलादेशमध्ये अचानक ‘रेजिम चेंज’ झाला आणि तिथे संविधान बदलले गेले. नेपाळमध्ये हिंसक मार्गाने ‘रेजिम चेंज’ घडवून आणत तिथली राज्यघटना बदलली गेली. श्रीलंकेमध्येही राष्ट्रपती भवनावर हल्ले करून ‘रेजिम चेंज’च्या नावाखाली संपूर्ण राजकीय व्यवस्था उलथवून टाकण्यात आली.”
तोच पॅटर्न भारतात आणण्याचा प्रयत्न
“नेमका हाच अराजकतेचा आणि संविधानाच्या विनाशाचा पॅटर्न आता भारतात राबवण्याचा कट विदेशी शक्तींच्या मदतीने शिजवला जात आहे. मात्र हा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारत आहे. येथे असा कोणताही देशविरोधी कट यशस्वी होऊ दिला जाणार नाही.”
1975ची आठवण विसरलात का?
काँग्रेसच्या संविधानावरील कथित प्रेमाचा बुरखा फाडताना फडणवीस यांनी 1975 च्या आणीबाणीचा इतिहास मांडला. “आज आम्हाला संविधानाचे धडे देणाऱ्या काँग्रेसने स्वतःच्या इतिहासाचे आत्मपरीक्षण करावे. 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आणि त्यांची निवडणूक अवैध ठरवली होती.”
संसदेत मतदानाचा अधिकार गमावला होता
“त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना पंतप्रधानपदी राहण्याची सशर्त अनुमती दिली असली, तरी लोकसभेत बोलण्यास आणि मतदान करण्यास मज्जाव केला होता. स्वतःची गेलेली खुर्ची वाचवण्यासाठी काँग्रेसने देशावर आणीबाणी लादली आणि संविधान पायदळी तुडवले.”
नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठवले
“न्यायालयाचे अधिकार निष्प्रभ करण्यासाठी काँग्रेसने संसदेतील बहुमताचा गैरवापर करून 42 वी घटनादुरुस्ती केली आणि नागरिकांचे मूलभूत हक्क गोठवले. नागरिकांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकारही हिरावून घेतला. हे पाप करणाऱ्यांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये.”
रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संविधानाचे रक्षण करू!
मुंबईतील रस्त्यांवर उतरलेल्या हजारो नागरिकांच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी निर्धार व्यक्त केला. “देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही ही संविधानाच्या मजबूत पायावर उभी आहे. जोपर्यंत आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक आहे, तोपर्यंत देशात कोणतीही अराजकता किंवा ‘रेजिम चेंज’ होऊ दिला जाणार नाही.”
नागरिकांनी जागरूक राहावे
“संविधान वाचवणे ही केवळ महायुती सरकारची जबाबदारी नसून देशातील 140 कोटी नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. विरोधकांचे खोटे नरेटिव्ह आणि संविधानाची मोडतोड करण्याचे मनसुबे उधळून लावण्यासाठी जनतेने एकसंध राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App