विशेष प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. “बँक सक्षम आणि प्रामाणिक लोकांच्या हातात जावी, ही आमची भूमिका आहे. ज्यांनी बँकेचे नुकसान केले, त्यांना पुन्हा संधी मिळू नये. त्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांसोबत ही निवडणूक लढवणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
गोरे पुढे म्हणाले, “भाजपमध्ये अनेक सक्षम कार्यकर्ते आणि नेते आहेत. ते बँकेचे प्रभावीपणे नेतृत्व करू शकतात. मात्र, या निवडणुकीत काहींचा अहंकार आड येण्याची शक्यता आहे. परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. विधानपरिषद निवडणुकीत भाजपची ताकद सर्वांनी पाहिली असून अनेकांचा गैरसमज दूर झाला आहे.”
सोलापूर जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत त्यांनी सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण होऊ नये, असेही मत व्यक्त केले. “शेतकऱ्यांचे हित जपणे आणि सहकार चळवळ मजबूत ठेवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांच्या सहकार्यानेच ही निवडणूक लढवली जाईल,” असे गोरे यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाच्या आदेशानंतर होणाऱ्या DCC बँकेच्या निवडणुकीमुळे सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली असून, आगामी काळात आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App