विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधकांकडून टीका सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांच्याविरोधातील आंदोलन आणखी तीव्र होईल आणि अखेरीस त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा दावा चिदंबरम यांनी केला.
‘स्वेच्छेने राजीनामा देणेच शहाणपणाचे’
वृत्तसंस्थेशी बोलताना चिदंबरम यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत आक्रमक भूमिका मांडली. “ज्ञानेश कुमार यांना कधी ना कधी राजीनामा द्यावाच लागेल, यात मला शंका नाही. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर स्वतःहून राजीनामा देणेच योग्य ठरेल. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर आंदोलन थांबणार नाही,” असे चिदंबरम म्हणाले.
INDIA आघाडीसह विविध सामाजिक आणि राजकीय गटांकडून या मुद्द्यावर आंदोलन केले जात असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. आंदोलनाचा दबाव वाढत जाईल आणि अखेरीस ज्ञानेश कुमार यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल, असा दावा त्यांनी केला.
‘ज्ञानेश कुमारांचा बचाव कोण करत आहे?’
ज्ञानेश कुमार यांना कोणाचा पाठिंबा आहे, असा प्रश्न विचारला असता चिदंबरम यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. सरकार कधी निवडणूक आयोगाचा बचाव करते, तर कधी आयोगाशी सरकारचा संबंध नसल्याचे सांगते, असे ते म्हणाले.
निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था असली तरी कोणीतरी ज्ञानेश कुमार यांना पाठबळ देत असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला. मात्र, त्यांना नेमका कोणाचा पाठिंबा आहे, हे आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘गरज पडल्यास इतर आयुक्तांच्याही राजीनाम्याची मागणी’
निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या भूमिकेबाबतही चिदंबरम यांनी भाष्य केले. या दोन्ही आयुक्तांच्या भूमिकेबाबत बेकायदेशीर किंवा संशयास्पद बाबींचे पुरावे समोर आल्यास त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
SIR प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांवरूनही सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातही आयोगाच्या कार्यपद्धती आणि SIR प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना चिदंबरमांचे आवाहन
चिदंबरम यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEOs) पुढे येऊन SIR प्रक्रियेबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचा उल्लेख करताना, ओडिशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुदतपूर्व निवृत्तीचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
“उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी सुरू होण्यापूर्वी राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढे यावे. त्यांना वरिष्ठ पातळीवरून कोणते निर्देश मिळाले, ते कधी मिळाले आणि त्या निर्देशांची अंमलबजावणी कशी करण्यात आली, हे देशासमोर सांगावे,” असे चिदंबरम म्हणाले.
SIR प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करत निवडणूक अधिकाऱ्यांनी आता मौन सोडून भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे, असेही चिदंबरम यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App