निदा खानच्या अडचणी वाढल्या; गंभीर गुन्ह्यात जामीन, पण आता पतीकडून घटस्फोटाची याचिका

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील तरुणी आणि तरुणाच्या कथित धर्मांतर प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात असलेल्या निदा एजाज खान हिच्यासमोर आता वैवाहिक आयुष्यातील नवे संकट उभे ठाकले आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या निदाच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या अर्जाची दखल घेत न्यायालयाने निदाला समन्स बजावले असून, १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. Nida Khan

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एका बहुराष्ट्रीय कंपनीतील पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोप आणि तपासाची प्रक्रिया न्यायालयीन पातळीवर सुरू आहे.

याशिवाय, मुंबई नाका पोलीस ठाण्यात याच कंपनीतील एका तरुणाच्या तक्रारीवरून तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन यांच्यासह निदा खान हिच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांत नाशिकरोड आणि नाशिक जिल्हा न्यायालयाने निदा खानला सशर्त जामीन मंजूर केल्याचे वृत्त आहे.



बदनामीमुळे वैवाहिक आयुष्यात तणाव?

२६ मार्चपासून या प्रकरणात नाव आल्यानंतर निदाला पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. याच काळात तिच्या वैवाहिक आयुष्यातही तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते.

या प्रकरणामुळे झालेली कथित बदनामी आणि निर्माण झालेल्या कौटुंबिक तणावाच्या पार्श्वभूमीवर तिच्या पतीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, घटस्फोटाच्या अर्जामागील नेमकी कारणे आणि दोन्ही पक्षांची भूमिका न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

त्यामुळे एकीकडे गर्भावस्था आणि सुरू असलेली कायदेशीर प्रक्रिया, तर दुसरीकडे वैवाहिक वाद, अशा दुहेरी परिस्थितीला निदाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

जामीन देताना न्यायालयाने केला होता श्रीकृष्णाचा संदर्भ

निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने बाळाच्या हिताचा आणि मानवी हक्कांचा विचार केला होता. यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ देत, आधुनिक आणि सुसंस्कृत समाजात निष्पाप नवजात बाळाला तुरुंगातील वातावरणाचा सामना करावा लागू नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचे वृत्त आहे.

या निरीक्षणानंतर निदा खानला जामीन मिळाला होता. मात्र, आता तिच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. १६ ऑक्टोबर रोजी निदा न्यायालयात हजर राहणार असून, त्यानंतर या वैवाहिक वादाच्या पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

Nida Khan’s troubles mount; granted bail in a serious case, but now faces a divorce petition from her husband.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात