विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने हर्षदा देशमुख-जाधव यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी पक्षांतर्गत चर्चेत त्यांच्या नावावर सहमती झाल्याचे समजते. त्यामुळे भाजपच्या स्मिता जाधव आणि महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Harshada Deshmukh-Jadhav
महाविकास आघाडीतील जागावाटप आणि उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून हर्षदा देशमुख-जाधव यांना संधी देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अधिकृत घोषणा झाल्यानंतर मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
पदवीधरांच्या प्रश्नांवर प्रचाराचा भर
या निवडणुकीत पदवीधर मतदारांचे प्रश्न केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या संधी, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, कौशल्यविकास, उद्योग क्षेत्रातील संधी आणि युवकांच्या विविध समस्यांवर प्रचारादरम्यान भूमिका मांडली जाऊ शकते. पुण्यासह परिसरातील पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग येण्याची शक्यता आहे.
महिला नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न?
हर्षदा देशमुख-जाधव यांच्या संभाव्य उमेदवारीच्या निमित्ताने महिला नेतृत्वाला राजकीय संधी देण्याच्या मुद्द्याचीही चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. महिलांना संधी मिळाल्यास त्या विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात, अशी भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर हर्षदा जाधव यांच्या संभाव्य उमेदवारीकडे पाहिले जात आहे.
‘दोन जाधव’ यांच्यात लढत होणार?
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपकडून स्मिता जाधव यांना उमेदवारी मिळाल्याची माहिती आहे. तर महाविकास आघाडीकडून हर्षदा देशमुख-जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही उमेदवारांच्या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्यास पुणे पदवीधर मतदारसंघात ‘जाधव विरुद्ध जाधव’ अशी लढत पाहायला मिळू शकते. त्यामुळे अधिकृत उमेदवारी घोषणेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App