विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाला सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्याची खंत व्यक्त करत भाजपसह महायुतीतील घटक पक्षांना घरचा आहेर दिला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीसोबत असताना रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेच्या सात जागा देण्यात आल्या होत्या. मात्र, २०१४ पासून भाजपसोबत महायुतीत असूनही पक्षाला विधान परिषदेची एकही जागा मिळालेली नाही, असा आरोप आठवले यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. Ramdas Athawale
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला आहे. २०१२ मध्ये आम्ही एकत्र येऊन महायुती केली होती, असे आठवले यांनी सांगितले. सध्याच्या महायुतीतील सर्व घटक पक्षांनी रिपब्लिकन पक्षाला योग्य न्याय देण्याची गरज आहे. सत्तेतील वाटा, मंत्रिपद आणि विधान परिषदेतील प्रतिनिधित्व या बाबतीत पक्षाला संधी मिळायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मित्रपक्षांवर अवलंबून राहण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, असेही आठवले म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित जागा मिळत नाहीत. सत्तेतील विविध पदांवरही पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही रिपब्लिकन पक्षाला जागा मिळाल्या नसल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई महापालिका निवडणुकीतही पक्षाला एकही जागा मिळाली नसल्याचे आठवले यांनी सांगितले.
या परिस्थितीला ‘अन्याय’ असे संबोधण्याऐवजी महायुतीतील मोठ्या पक्षांनी रिपब्लिकन पक्षाला सत्तेत योग्य वाटा द्यावा, अशी आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आठवले यांनी महायुतीतील जागावाटप आणि सत्तेतील प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
रिपब्लिकन पक्षांच्या एकीची गरज
रिपब्लिकन चळवळीतील विविध पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला मजबूत राजकीय पक्ष उभा करण्यात आपण अद्याप यशस्वी झालो नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्र आले, विविध सामाजिक घटक पक्षासोबत जोडले गेले आणि सर्वधर्मीय समाजाचा सहभाग वाढला, तर रिपब्लिकन पक्षाची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असे आठवले यांनी म्हटले.
निवडणूक आयोगाच्या आंदोलनावरही भाष्य
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरही रामदास आठवले यांनी भूमिका मांडली. निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, मतदार याद्यांमधून अनेक नागरिकांची नावे वगळली गेल्याच्या तक्रारींकडे निवडणूक आयोगाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आयोगाने प्रयत्न करावेत, अशी मागणी आठवले यांनी केली. त्यामुळे एका बाजूला निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनावर त्यांनी आक्षेप घेतला, तर दुसरीकडे मतदारांच्या तक्रारींची दखल घेण्याचे आवाहनही केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App