विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी ही केवळ संवादाचे माध्यम नसून समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दैनंदिन व्यवहारातील मराठीचा वापर वाढविण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमाचा चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर्सी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात शुभारंभ झाला. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी उपस्थित होते.
‘अभिजात भाषेचा दर्जा हा अभिमानाचा क्षण’
मराठी भाषा प्राचीन आणि अभिजात आहेच; मात्र केंद्र सरकारकडून तिला अभिजात भाषेची अधिकृत मान्यता मिळणे हा मराठी भाषकांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय पातळीवर विशेष स्थान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संकल्पनेसह स्वभाषेलाही महत्त्व दिले. राज्यकारभारात मराठीचा वापर वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून मराठीच्या प्रशासकीय वापराला नवी दिशा मिळाली, अशी आठवणही फडणवीस यांनी करून दिली.
मराठीची शब्दसंपदा १३ लाखांपर्यंत नेण्याची गरज
जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा १३वा क्रमांक असल्याचे सांगत फडणवीस यांनी मराठीच्या शब्दसंपदेचा विशेष उल्लेख केला. विसाव्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरामध्ये ११ ते १३ लाख शब्द असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
तुलनेत ऑक्सफर्ड शब्दकोशात सुमारे सहा लाख शब्द, तर मँडरिन, स्पॅनिश आणि फ्रेंचसारख्या भाषांमध्ये साधारण तीन ते साडेतीन लाख शब्द असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे तीन लाख शब्द आहेत. त्याच्या पुढील आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा १३ लाख शब्दांपर्यंत नेण्याचे काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मराठीचा हा शब्दवैभव केवळ अभिमानाचा विषय न राहता आधुनिक ज्ञाननिर्मितीमध्ये त्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि संशोधनातील संकल्पना मराठीत उपलब्ध झाल्यास मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा बनेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘मराठी AI’च्या माध्यमातून नव्या युगाशी नाते
डिजिटल तंत्रज्ञानामुळे संवादाची माध्यमे वेगाने बदलत आहेत. त्यामुळे मराठीला केवळ पारंपरिक वापरापुरते मर्यादित न ठेवता नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.
‘मराठी AI’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढविणे, डिजिटल माध्यमांवर मराठीतील माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणे तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी कंटेंट मोठ्या प्रमाणात निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये मराठीतील ज्ञानसामग्री उपलब्ध झाल्यास नव्या पिढीला मातृभाषेतून आधुनिक ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बोलीभाषांचा वारसाही जपण्याचे आवाहन
प्रमाण मराठीसोबत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा हा मराठीचा अमूल्य ठेवा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी-अहिराणी, मालवणी, डांगी आणि झाडीबोली यांसारख्या बोलीभाषांमध्ये स्थानिक संस्कृती, लोकपरंपरा आणि जीवनानुभव सामावलेले आहेत. त्यामुळे या बोलींचे साहित्य, लोकपरंपरा आणि भाषिक वैशिष्ट्ये जतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मराठी नाट्यसंस्कृतीचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. आधुनिक तंत्रज्ञानाची साधने मर्यादित असतानाही अनेक पिढ्यांनी मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जिवंत ठेवली. कलावंतांनी अभिनय, लेखन आणि प्रयोगशीलतेतून मराठी रंगभूमीला वेगळी ओळख मिळवून दिली, असे फडणवीस यांनी नमूद केले.
‘दैनंदिन व्यवहारातून मराठीचे संवर्धन करा’
मराठीचे जतन आणि संवर्धन केवळ शासकीय उपक्रमांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक मराठी भाषिकाने दैनंदिन व्यवहारातून योगदान देणे आवश्यक आहे. घर, शिक्षण, प्रशासन, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमे अशा सर्व क्षेत्रांत मराठीचा अधिकाधिक वापर वाढला पाहिजे.
परंपरेचा अभिमान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत मराठीला भविष्यातील सक्षम ज्ञानभाषा बनविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये : एकनाथ शिंदे
माय मराठी ही केवळ महाराष्ट्राची ओळख नसून आपला स्वाभिमान आहे. संत ज्ञानेश्वरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतच्या समृद्ध परंपरेने नटलेली मराठी आता सातासमुद्रापार पोहोचली असून जगभरात तिचा डंका वाजत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
डिजिटल जगत, सोशल मीडिया, पॉडकास्ट, गेमिंग आणि कोडिंगसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढवून नव्या पिढीला मराठीशी जोडले पाहिजे. जगातील ५० हून अधिक देशांमध्ये मराठीचा प्रचार आणि प्रसार वाढविण्याचा संकल्प असून, लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी केंद्र’ उभारण्याबरोबरच पुढील विश्व मराठी साहित्य संमेलनही लंडनमध्ये आयोजित केले जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
लंडनमध्ये सुमारे ७० ते ८० हजार मराठी बांधव वास्तव्यास असून, महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून मराठीचे शिक्षण, अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र परीक्षांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी वाढदिवस, सत्कार किंवा अन्य आनंदाच्या प्रसंगी पुष्पगुच्छाऐवजी मराठी पुस्तके भेट देण्याची संस्कृती रुजवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
लंडनमध्ये ‘मराठी वैश्विक केंद्र’, १०० बोलीभाषांचे कोश
मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि जागतिक पातळीवर विस्तार करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
पुण्यातील डेक्कन युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेसाठी ‘उत्कृष्टता केंद्र’, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ‘मराठी वैश्विक केंद्र’, राज्यातील विविध बोलीभाषांचे १०० कोश आणि नऊ ठिकाणी ‘मराठी कौशल्य विकास केंद्र’ उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
परदेशातील मराठी बांधवांशी संवाद वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ देशांमध्ये ‘नमो संवाद’ कार्यक्रम सुरू करण्यात आला असून, परदेशातील मराठी बांधवांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्थाही करण्यात येत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय मराठी मंचांची संख्या सध्या ५२ वर पोहोचली असून ती लवकरच ७५ पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्यिकांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत राज्य सरकारकडून ‘साहित्य संग्रहालय’ आणि अत्याधुनिक ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याचे काम सुरू असल्याचेही सामंत यांनी नमूद केले.
अभिजात मराठीच्या संशोधनासोबत डिजिटायझेशनवर भर
– सचिव किरण कुलकर्णी
मराठी भाषेचा प्रवाह केवळ ज्ञानेश्वर महाराज किंवा चक्रधर स्वामी यांच्या काळापासून सुरू झालेला नसून, सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या ‘गाथा सप्तशती’पासून तिची समृद्ध परंपरा पुढे आलेली आहे. या प्रदीर्घ भाषिक वारशाचे संशोधन, जतन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठी भाषा विभाग कटिबद्ध असल्याचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सांगितले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिची अभिजातता, भाषिक परंपरा आणि ज्ञानसंपदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. यंदा विशेषतः युवकांना केंद्रस्थानी ठेवून मराठीचा प्रसार आणि संवर्धनावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या विश्वकोश निर्मितीच्या कार्याला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. विश्वकोशातील ज्ञानसंपदा डिजिटल स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असून, विश्वकोशाचे काम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पोर्टलवर उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत ग्रंथ भेट देऊन करण्यात आले. यावेळी ‘मराठीचे कौतुक भाग–२’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App