विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजप नेते शरद अरुण लाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या निर्णयाबाबत आपली कोणतीही नाराजी नसून, महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी आपण आणि आपले सहकारी पूर्ण ताकदीने काम करू, असे त्यांनी जाहीर केले आहे.
भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद लाड यांनी अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडली. मागील दोन वर्षांपासून पुणे विभागातील पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे काम आपण आणि सहकारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने पक्षहिताच्या दृष्टीने निर्णय घेताना आपल्याला पूर्णपणे विश्वासात घेतले होते, असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
‘पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करतो’
“पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून डॉ. स्मिता योगेश जाधव यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. पक्षाने पक्षहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेताना मला पूर्णपणे विश्वासात घेतले असून, मी या निर्णयाचे स्वागत करतो,” असे शरद लाड यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी न मिळाल्याने आपण नाराज असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत आपण आणि आपले सर्व सहकारी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून, त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘भविष्यात पक्ष माझ्या कामाची दखल घेईल’
पक्षासाठी आजवर केलेल्या कामाचा आणि योगदानाचा विचार भविष्यात पक्षश्रेष्ठी नक्कीच करतील, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला. पक्षाचा निर्णय अंतिम असून पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शरद लाड यांच्या या पत्रकामुळे ते बंडखोरी करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात ते सक्रिय सहभाग घेणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून इतर मतदारसंघांतही उमेदवार जाहीर
दरम्यान, भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नागपूरमध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानंतरही अनिल सोले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App