भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला युरेनियमचा आधार; यूसीआयएलचा हीरक महोत्सवी वर्ष सोहळा

Uranium Corporation of India: युरेनियम उत्खनन आणि प्रक्रिया क्षेत्रातील सहा दशकांच्या वाटचालीचा गौरव; जादुगोड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या युरेनियमच्या उत्खनन आणि प्रक्रियेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (UCIL) सहा दशकांची वाटचाल पूर्ण केली आहे. यूसीआयएलच्या स्थापनेला 4 ऑक्टोबर 2026 रोजी 59 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीकडून हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. झारखंडमधील जादुगोडा येथे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

अणुऊर्जा विभागाच्या अखत्यारितील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या यूसीआयएलची स्थापना 4 ऑक्टोबर 1967 रोजी झाली. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी स्वदेशी युरेनियम उत्खनन आणि प्रक्रिया क्षमता विकसित करण्यामध्ये यूसीआयएलने गेल्या सहा दशकांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

या कार्यक्रमाला अणुऊर्जा आयोगाच्या सदस्य-वित्त सीमा जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी जादुगोडा येथील ‘टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन पायलट प्लांट’ला भेट दिली. तसेच जादुगोडा भूमिगत खाणीतील सुमारे 815 मीटर खोलीवर प्रस्तावित ‘डार्क मॅटर लॅबोरेटरी’च्या नव्या स्थळाचीही पाहणी केली.

‘सहा दशकांचा अनुभव म्हणजे राष्ट्रीय सेवेला समर्पित प्रवास’

कार्यक्रमाला संबोधित करताना सीमा जैन यांनी यूसीआयएलच्या कामगिरीचे कौतुक केले. यूसीआयएलचे हीरक महोत्सवी वर्ष म्हणजे वैज्ञानिक क्षमता, संस्थात्मक अनुभव आणि राष्ट्रासाठी केलेल्या समर्पित सेवेचा सहा दशकांचा उत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या युरेनियम उत्खनन आणि प्रक्रिया क्षमतांचा पाया घालणाऱ्या अग्रदूतांना आणि डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्याची ही संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

जमिनीच्या उदरातील युरेनियमच्या उत्खननापासून देशाच्या व्यापक अणुऊर्जा कार्यक्रमापर्यंतच्या प्रवासात स्वदेशी क्षमता विकसित करण्यासाठी यूसीआयएलने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आव्हानात्मक परिस्थितीत काम करत यूसीआयएलच्या अनेक पिढ्यांतील कर्मचाऱ्यांनी या राष्ट्रीय उपक्रमाला पुढे नेण्यासाठी निष्ठा आणि जिद्द दाखवली, असे सीमा जैन यांनी सांगितले.

अणुऊर्जा कार्यक्रमात यूसीआयएलचे योगदान महत्त्वाचे

अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजितकुमार मोहंती यांनीही यूसीआयएलला शुभेच्छा दिल्या. भारत अणुऊर्जा क्षेत्रात सातत्याने प्रगती करत असताना नवोन्मेष आणि क्षमता बांधणीचे महत्त्व अधोरेखित करण्याची हीरक महोत्सवी वर्ष ही महत्त्वाची संधी असल्याचे त्यांनी म्हटले.



पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा

हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष कार्यशाळा. नरवापहार माहिती केंद्र येथे झालेल्या या कार्यशाळेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना यूसीआयएलच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाली.

या कार्यशाळेदरम्यान पत्रकारांनी शास्त्रज्ञ, अभियंते आणि तांत्रिक तज्ज्ञांशी संवाद साधला. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील विज्ञान, तंत्रज्ञान, अणु व किरणोत्सार तंत्रज्ञान तसेच त्याच्या विविध उपयोजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

पत्रकारांनी यूसीआयएलच्या युरेनियम खाणकाम आणि धातुक प्रक्रिया सुविधांनाही भेट दिली. यावेळी खाणकामाची कार्यपद्धती, खनिज हाताळणी, प्रक्रिया प्रणाली, तंत्रज्ञान तसेच कामाच्या ठिकाणी अवलंबण्यात येणाऱ्या सुरक्षा पद्धतींची माहिती घेण्यात आली.

डीएई तंत्रज्ञान प्रदर्शन ठरले आकर्षण

या कार्यक्रमासोबत अणुऊर्जा विभागाच्या विविध केंद्रे आणि संस्थांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञान व त्याच्या उपयोजनांचे प्रदर्शन करणारे डीएई तंत्रज्ञान प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. अणुऊर्जेचे औद्योगिक तसेच सामाजिक उपयोग या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष तंत्रज्ञान प्रदर्शनात अणुऊर्जा क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील उपयोग सादर करण्यात आले.

‘यूसीआयएल कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण’

यूसीआयएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कचम आनंद राव यांनी हीरक महोत्सवी वर्ष हे यूसीआयएल कुटुंबातील प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले.

गेल्या सहा दशकांहून अधिक काळात यूसीआयएलने युरेनियम उत्खनन आणि प्रक्रियेसाठी आवश्यक कौशल्य आणि पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. त्याचबरोबर तंत्रज्ञान, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापनाच्या क्षेत्रातही संस्थेने आपली क्षमता अधिक बळकट केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार कार्यशाळा आणि डीएई तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून यूसीआयएलच्या कामकाजामागील विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींची माहिती प्रसारमाध्यमांना प्रत्यक्ष मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खाणकामापासून पर्यावरण व्यवस्थापनापर्यंत क्षमता विकसित

1967 मध्ये स्थापन झालेल्या यूसीआयएलने भारताच्या स्वदेशी युरेनियम उत्खनन आणि प्रक्रिया क्षमतेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी आवश्यक संसाधनांचा आधार देण्याबरोबरच संस्थेने भूमिगत आणि खुल्या खाणकामापासून खनिज प्रक्रिया, तंत्रज्ञान विकास, व्यावसायिक सुरक्षा, किरणोत्सारापासून संरक्षण आणि पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रांत विशेषीकृत क्षमता विकसित केली आहे.

यूसीआयएलच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गेल्या सहा दशकांतील या वाटचालीचा आढावा घेण्यात आला असून, भविष्यातील अणुऊर्जा कार्यक्रमासाठी नव्या तंत्रज्ञानासह क्षमता अधिक बळकट करण्याचा संकल्पही अधोरेखित करण्यात आला.

Source : PIB

Uranium Corporation of India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात