विशेष प्रतिनिधी
मुंबई : कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनात चुकीची माहिती देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकरी समाजासह राज्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण झाल्याचा दावा करत सीजेपीने आंबेडकरी जनतेची आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी दरेकर यांनी शनिवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.Pravin Darekar
‘सीजेपीचे आंदोलन सपशेल अयशस्वी’
सीजेपीचे आंदोलन पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा दावा करत दरेकर यांनी आंदोलनाला प्रतिसाद न दिल्याबद्दल मुंबईकरांचे आभार मानले. तसेच आंदोलनाची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले.
हे आंदोलन काँग्रेसच्या स्क्रिप्टनुसार करण्यात आले होते. अभिजीत दिपके हे काँग्रेसचा चेहरा असून, सीजेपीचे आंदोलन काँग्रेस पुरस्कृत होते, असा आरोप दरेकर यांनी केला. मोर्चात डाव्या विचारसरणीच्या लोकांचा सहभाग दिसून आला. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनाचे आयोजक निराश आणि गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होते, अशी टीकाही त्यांनी केली.
‘सीजेपी काँग्रेसची बी टीम’
भाजपविरोधी वातावरण निर्माण करणे आणि काँग्रेसचे राजकीय महत्त्व वाढवणे, हाच या आंदोलनामागील उद्देश असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. विरोधकांकडे स्वतःची ताकद दाखवण्यासाठी पुरेसा जनाधार नसल्याने अशा आंदोलनांच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले. सीजेपी ही काँग्रेसची ‘बी टीम’ म्हणून काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांवरही दरेकर यांनी आक्षेप घेतला. शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला अशी भूमिका मान्य नसल्याचे ते म्हणाले.
‘आदित्य ठाकरे, महेश सावंत यांनी आधी राजीनामे द्यावेत’
आंदोलन करण्याच्या अधिकाराला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना दरेकर म्हणाले की, आंदोलने पारदर्शक आणि जनहितासाठी असली पाहिजेत. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर विश्वास नसेल, तर आमदार आदित्य ठाकरे आणि महेश सावंत यांनी सर्वप्रथम आपल्या आमदारकीचे राजीनामे द्यावेत आणि त्यानंतर आंदोलनात सहभागी व्हावे, असे आव्हान त्यांनी दिले. कारण तेही याच निवडणूक प्रक्रियेतून निवडून आले आहेत, असे दरेकर म्हणाले.
SIR प्रक्रियेवरूनही दरेकरांचा विरोधकांना सवाल
मतदार यादीत चुकीची नावे समाविष्ट होऊ नयेत आणि योग्य माहिती समोर यावी, यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया राबवली जात असल्याचे दरेकर यांनी सांगितले. मात्र, या प्रक्रियेतील कायदेशीर बाबींवर चर्चा करण्याऐवजी केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची टीका त्यांनी केली.
निराधार आरोप करून संभ्रम निर्माण करणे, राजकीय वातावरणात गोंधळ घालणे आणि असंतोष वाढवून अराजकतेची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नसल्याचेही दरेकर यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App