महिला सक्षमीकरणासाठी समाजाच्या सहभागाची गरज : अमृता फडणवीस

ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या ‘ऊर्जा पुरस्कार’ सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

विशेष प्रतिनिधी 

पुणे : बालविकास आणि महिला सक्षमीकरण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी सक्रिय योगदान देणे आवश्यक आहे. महिला, बालक, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार सकारात्मक काम केले, तर समाजात मोठा बदल घडू शकतो, असे प्रतिपादन दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापिका अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे आयोजित ‘ऊर्जा पुरस्कार’ वितरण सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे, पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, लोकमंगल फाउंडेशनचे विश्वस्त रोहन देशमुख, भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा, अभिनेते चंकी पांडे तसेच दिग्दर्शक व्यंकटेश (व्यंकी) कुडुमुला आदी मान्यवर उपस्थित होते.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी यांसारख्या महिलांनी आपल्या कर्तृत्वातून देशाला दिशा दिली. आजही अशाच ध्येयवेड्या आणि समाजासाठी काम करणाऱ्या महिलांची गरज आहे. समाजातील प्रत्येकाने सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी योगदान दिले पाहिजे.

त्या पुढे म्हणाल्या, “भारत हा केवळ भौगोलिक सीमांचा देश नसून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांनी समृद्ध असे राष्ट्र आहे. शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, क्रीडा आणि संरक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या कार्यामुळेच देशाची खरी ओळख जगासमोर निर्माण होते.”

यावेळी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांना ‘ऊर्जा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच विशेष आरोग्यसेवेसाठी डॉ. संजय गुप्ते, उद्योजकतेसाठी सुलज्जा फिरोदिया मोटवानी, क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल तिलक वर्मा, साहित्यसेवेसाठी प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे आणि शिक्षण व समाजसेवेसाठी अण्णाराव भिमशंकर राजमाने यांचा गौरव करण्यात आला.



उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान अर्जुन जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वीरपत्नी सायली जाधव तसेच कुटुंबीयांना ‘शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. माळशिरस दुर्घटनेत पाच जणांचे प्राण वाचवणारे तांदुळवाडी येथील इरफान मुजावर यांना ‘मानवतावादी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, शाल आणि तुळशीचे रोप प्रदान करण्यात आले.

यावेळी डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी महिला सक्षमीकरण आणि बालविकास या क्षेत्रात समाज आणि शासन या दोघांनीही अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून उषा काकडे यांनी महिला आणि बालकांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्म पुरस्काराने गौरवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात उषा काकडे यांनी ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘गुड टच–बॅड टच’ अभियानाद्वारे लैंगिक अत्याचारांविषयी जनजागृती करण्याचे काम फाउंडेशन करत असून, आतापर्यंत सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा, मुलींना आत्मविश्वास द्यावा आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. विद्या येरवडेकर यांनी उषा काकडे यांच्या सामाजिक आणि उद्योजकीय प्रवासाचे कौतुक केले. डॉ. संजय गुप्ते यांनी कर्करोग जनजागृतीसारख्या विषयांवरही फाउंडेशनने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अण्णाराव राजमाने यांनी मतिमंद मुलांच्या पुनर्वसनातील आव्हानांवर प्रकाश टाकला, तर प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी लोककला आणि लोकसाहित्याच्या जतनासाठी अधिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली.

भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा यांनी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान व्यक्त करत, देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात व्यंकी कुडुमुला, चंकी पांडे, रोहन देशमुख आणि इरफान मुजावर यांनीही मनोगत व्यक्त केले. शहीद अर्जुन जाधव यांच्या कुटुंबीयांचा सन्मान होताच सभागृहातील वातावरण भावूक झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना सलढाणा-जोशी यांनी केले, तर आराध्या काकडे यांनी आभार मानले.

Everyone in society should take the initiative for child development and women’s empowerment: Amruta Devendra Fadnavis.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात