विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी परवानगीशिवाय निदर्शने केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे ६०० जणांना ताब्यात घेतले. यामध्ये महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, बॉलिवूड अभिनेता इमरान खान, तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईदरम्यान काही आंदोलकांनी पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला आहे. Tushar Gandhi, Actor Imran Khan
शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान, हुतात्मा चौक आणि मुंबईतील अन्य ठिकाणी आंदोलन करण्यात आले. तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘हम भारत के लोग’ संघटनेचे सदस्य आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते ऑगस्ट क्रांती मैदानावर जमले होते. परवानगी न घेता आंदोलन केल्याने त्यापैकी सुमारे २०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील विविध ठिकाणांहून मिळून सुमारे ६०० जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आंदोलकांना गावदेवी आणि ताडदेव पोलिस ठाण्यांत नेण्यात आले.
दिवसाच्या सुरुवातीला पोलिसांनी तुषार गांधी यांना वांद्रे येथून ताब्यात घेऊन डी. एन. नगर पोलिस ठाण्यात नेले होते. त्यांच्या ताब्याची माहिती समजल्यानंतर पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने समर्थक जमले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही पोलिस ठाण्यात जाऊन तुषार गांधी यांच्या सुटकेची मागणी केली. त्यांच्यासोबत अनिल परब, महेश सावंत, अजय चौधरी आणि हरून शेख यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत तुषार गांधी यांना पोलिस ठाण्यातून अज्ञात ठिकाणी नेल्याचा आरोप केला. त्यांना तातडीने समोर आणण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, पोलिसांनी तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर सुमारे नऊ तासांनी सोडल्याची माहिती समोर आली. तुषार गांधी यांनी यापूर्वी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्टर प्रसिद्ध करून नागरिकांना दुपारी ३.३० वाजता ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलनासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, दादर येथील शिवाजी पार्क परिसरात कॉकरोच जनता पार्टीच्या सदस्यांना आंदोलन करता येऊ नये, यासाठी महिला पोलिस अधिकाऱ्यांसह अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या संपूर्ण कारवाईदरम्यान काही आंदोलकांनी पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याची तक्रार केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App