विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार सरकार आणि मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची भूमिका घेत असताना त्यांच्या विचारांवर चालणाऱ्यांनीही हट्टाची भूमिका घेऊ नये. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राणे यांनी केले.
लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील अहिल्या अभ्यासिकेसमोर सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राणे यांनी भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा बहुपर्यायी अर्थात ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्याची मागणी करत आहेत.
“शरद पवार यांनी स्वतः सरकार आणि मुख्यमंत्र्यांशी सुसंवाद साधण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्यासारखा अनुभवी नेता समंजस भूमिका घेत असेल, तर त्यांच्या विचारांवर चालणाऱ्यांनीही उगाच हट्ट न धरता विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे,” असे राणे म्हणाले.
शरद पवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एमपीएससी आंदोलनाबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली होती. तसेच सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधावा, अशी भूमिका मांडली होती.
‘रोहित पवार माझे चांगले मित्र; राजकीय शत्रू नाहीत’
एस. एम. जोशी पुलाजवळ दुसऱ्या गटाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित पवार यांच्याबाबत राणे यांनी मिश्कील टिप्पणी केली. “रोहित पवार माझे चांगले मित्र आहेत. ते माझे राजकीय शत्रू नाहीत. उद्या कदाचित तेही आमच्यासोबत सरकारमध्ये मंत्री असतील,” असे ते म्हणाले.
रोहित पवार हे प्रामाणिक कार्यकर्ते असल्याचे सांगतानाच, त्यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारीही सर्वांनी लक्षात ठेवावी, असे राणे यांनी नमूद केले.
“मी येथे आमदार किंवा मंत्री म्हणून आलेलो नाही, तर विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील एक मित्र म्हणून आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे कोणीही या आंदोलनाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये,” असे आवाहन त्यांनी केले.
‘१३ पैकी १२ मागण्या मार्गी’; राणेंचा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी जवळपास तीन तास चर्चा केली असून, विद्यार्थ्यांच्या १३ पैकी १२ मागण्या मार्गी लागल्याचा दावा राणे यांनी केला. आंदोलनानंतर सरकारने एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपळकर यांची बदली केली आहे. मात्र, आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी अद्याप कायम आहे.
“आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान मानतो. घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींबाबत ठरावीक नियम आणि प्रक्रियेनुसारच निर्णय घ्यावा लागतो. सरकारने आधीच सचिवांची विकेट काढली आहे. उर्वरित प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल,” असे सूचक विधान राणे यांनी केले.
परीक्षा पद्धतीबाबत समितीचा अहवाल पारदर्शक राहणार
राज्यातील ९९ टक्के विद्यार्थ्यांची मागणी परीक्षा बहुपर्यायी अर्थात ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्याची असल्याचा दावाही राणे यांनी केला. परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यासाठी राज्य सरकारने व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी हे या समितीचे सदस्य असल्याचे सांगताना समितीचा अहवाल पूर्णपणे पारदर्शक असेल, असे राणे म्हणाले. विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्या लक्षात घेऊनच राज्य सरकार निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुण्यातील एमपीएससी आंदोलन वेगवेगळ्या गटांत विभागले गेले आहे. एका गटाकडून आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्याची मागणी होत आहे, तर दुसऱ्या गटाने वर्णनात्मक अर्थात डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा पद्धत कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीचा प्रश्न आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी यावरून आंदोलनातील मतभेद कायम असल्याचे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App