महाराष्ट्राच्या फिनटेक इकोसिस्टीमची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्हच्या नव्या कॅम्पसची पायाभरणी; 40 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार सुविधा

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राला आणखी बळ मिळणार असून पुण्यात बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक कॅम्पसची पायाभरणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी कॅम्पसची पायाभरणी आणि स्मृतिफलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुण्यात उभारण्यात येणारे बजाज फिनसर्व्हचे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी सुसज्ज मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल. पुण्याची ओळख आधुनिक, वेगवान आणि उत्तम मोबिलिटी असलेल्या शहराच्या रूपात निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारण्यात येत आहेत.

मुंबई-पुणे फिनटेक इकोसिस्टीमची राजधानी

महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही शहरे देशाच्या फिनटेक इकोसिस्टीमची प्रमुख केंद्रे बनली आहेत. फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुंबईने फिनटेक गुंतवणुकीच्या बाबतीत बंगळुरूलाही मागे टाकले असून, देशातील एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी 61 टक्के गुंतवणूक मुंबईत झाली आहे.

फिनटेक स्टार्टअप्समध्येही मोठी वाढ झाली असून या क्षेत्रात 59 टक्के वाढ आणि 900 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. ही फिनटेक इकोसिस्टीम आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरपर्यंत विस्तारण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

“लवकरच नागपूरमध्येही बजाज फिनसर्व्हची सेवा सुरू झालेली दिसेल,” असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पुण्यात वेगवान वाहतुकीचे जाळे

पुणे शहराचा वेगाने विस्तार होत असून त्याला अनुरूप पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे. बाह्य आणि अंतर्गत रिंगरोडसोबतच शहरात भुयारी मार्गांचे जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पुढील 3 ते 4 वर्षांत पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले आधुनिक शहर म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विकास प्रक्रियेत बजाज फिनसर्व्हचा आधुनिक कॅम्पस महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

40 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार सुविधा

पुण्यात उभारण्यात येणारा बजाज फिनसर्व्हचा परिसर देशातील महत्त्वाच्या आणि शाश्वत कॉर्पोरेट सुविधांपैकी एक ठरेल. या संपूर्ण व्यवस्थेत सुमारे 40 हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.

कॅम्पसला जोडणारा रस्ता आणि अतिरिक्त पूल इमारतींचे काम पूर्ण होण्यापूर्वीच उभारण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.



दरम्यान, बजाज समूहाने पुण्यात कला आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. महानगरपालिका आणि इतर संबंधित घटकांच्या सहकार्याने हे केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.

फिनटेकमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व कायम ठेवण्याचा निर्धार

आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्याला आणखी पुढे नेण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे. देशातील डोमेस्टिक इन्शुरन्स आणि डिजिटल लेंडिंग मार्केटमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

फिनटेक क्षेत्रातील महाराष्ट्राचे नेतृत्व आणखी मजबूत करण्यासाठी बजाज फिनसर्व्हने राज्य सरकारसोबत सहकार्य करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

‘राष्ट्रनिर्माणात बजाज समूहाचे मोठे योगदान’

फायनान्शियल टेक्नॉलॉजीचा प्रभावी वापर करून बजाज फिनसर्व्हने आर्थिक क्षेत्रात आधुनिकता आणली आहे. त्यामुळे फिनटेक क्षेत्रातील महत्त्वाची संस्था म्हणून या समूहाकडे पाहिले जाते, असे फडणवीस यांनी नमूद केले.

बजाज समूहाने स्थापनेपासून भारताच्या औद्योगिक विकासात आणि राष्ट्रनिर्माणात दिलेल्या योगदानाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. सामाजिक उपक्रमांमध्ये समूहाच्या सहभागाचेही त्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Foundation stone laid for Bajaj Finserv’s new campus in Pune; 40,000 employees to benefit from the facilities.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात