विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे झालेल्या भीषण अपघातात टीडीआरएफ (TDRF) जवान विकास लहू गोरे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी कुटुंबीयांची भेट घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शहापूरहून ठाण्याकडे दुचाकीवरून कामावर जात असताना रस्त्यातील खड्ड्यात वाहन गेल्याने अपघात झाला आणि त्यात विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. Vikas Gore
घटनेनंतर टीडीआरएफच्या 28 जवानांचे पथक विकास गोरे यांच्या घरी पोहोचले. कुटुंबीयांची भेट घेताना अनेक सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. 2019 पासून ठाणे अग्निशमन दल आणि टीडीआरएफसोबत कार्यरत असलेले विकास गोरे हे धाडसी, कर्तव्यदक्ष आणि तत्पर जवान म्हणून ओळखले जात होते. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली की सर्वात आधी घटनास्थळी पोहोचणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश असायचा, असे सहकाऱ्यांनी सांगितले.
सहकाऱ्यांनी सांगितले की, भिवंडीतील इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याच्या मोहिमेत विकास यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाण्यातील बचावकार्यातही त्यांना विशेष कौशल्य होते. नदी, तलाव किंवा पूरस्थितीतील प्रत्येक बचाव मोहिमेसाठी ते नेहमी तयार असायचे.
यावेळी सहकाऱ्यांनी वेदना व्यक्त करत म्हटले, “आम्ही हजारो लोकांचे जीव वाचवतो, पण आमचाच सहकारी रस्त्यावर मदतीसाठी हाका मारत राहिला.” अपघातानंतर विकास बराच वेळ मदतीसाठी आर्त हाक देत होता, मात्र वेळेत मदत न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, विकास यांचे कुटुंब कधीही एकटे पडू देणार नाही, आम्ही 28 भाऊ कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू, असा शब्दही सहकाऱ्यांनी दिला.
विकास गोरे हे केवळ बचावकार्यापुरते मर्यादित नव्हते, तर टीममधील सर्वांच्या आवडीचे सहकारी होते. विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवणे आणि कोणालाही इजा होऊ न देणे, हेच त्यांच्या कामाचे ध्येय होते, अशी भावना सहकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने रस्त्यांची सुरक्षितता, खड्ड्यांची दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थेकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी टीडीआरएफच्या जवानांनी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App