विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय रणसंग्राम रंगणार आहे. सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघ सोडल्यानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत तब्बल पाच प्रमुख उमेदवार मैदानात उतरल्याने ही लढत पंचरंगी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संपूर्ण पश्चिम बंगालचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी नंदीग्रामसह भवानीपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. भवानीपूरमध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी नंदीग्रामची जागा सोडल्याने आता या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भावनिक मुद्द्याला हात घालत उमेदवाराची निवड केली आहे.
माजी पीएच्या आईला भाजपची उमेदवारी
भाजपने नंदीग्राममधून हसिरानी रथ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. चंद्रनाथ रथ हे सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे स्वीय सहायक म्हणून काम करत होते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची हत्या झाली होती.
चंद्रनाथ रथ हे अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या आईला उमेदवारी देण्यामागे भाजपची भावनिक रणनीती असल्याची चर्चा आहे. या उमेदवारीच्या माध्यमातून मतदारांमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
तृणमूलमध्येही उमेदवारीवरून फूट
नंदीग्रामच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेससमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. तृणमूलच्या दोन गटांकडून स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरविण्यात आले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने संचिता प्रधान डे यांना उमेदवारी दिली आहे, तर बंडखोर गटाने मोहम्मद एतेसमुल हक यांना मैदानात उतरविले आहे.
याशिवाय काँग्रेसने मिलन प्रधान यांना उमेदवारी दिली असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शांती गोपाल गिरी यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यामुळे भाजप आणि तृणमूलमधील प्रमुख लढतीसोबतच इतर पक्षांच्या उमेदवारांमुळे निवडणुकीचे गणित अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
ममतांसाठी प्रतिष्ठेची परीक्षा
नंदीग्राममध्ये सर्वाधिक लक्ष भाजपच्या उमेदवारासोबतच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल उमेदवाराकडे असणार आहे. या मतदारसंघात भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांची संघटनात्मक ताकद आहे. सुवेंदू अधिकारी यांनी याच मतदारसंघातून एकदा तृणमूलच्या तिकिटावर, तर त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे.
२००९ ते २०२१ या काळात नंदीग्रामवर तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते. मात्र, सुवेंदू अधिकारी यांच्या भाजप प्रवेशानंतर येथील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला. आता तृणमूलमधील बंडखोरीमुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे.
पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या उमेदवाराला किती मते मिळतात आणि भाजपच्या भावनिक रणनीतीचा मतदारांवर किती परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नंदीग्रामचा हा निकाल भविष्यातील पश्चिम बंगालच्या राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App