गणेशोत्सवाला जागतिक व्यासपीठ मिळणार? आशिष शेलारांची मोठी घोषणा; ‘या’ उपक्रमाची सुरुवात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जगाच्या व्यासपीठावर पोहोचविण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, तसेच या उत्सवाचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. Ashish Shelar

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रेक्लमेशन येथे ‘Bappa.org’ आणि ‘महाराष्ट्र गणेश उत्सव राज्य महोत्सव’ यांच्या अधिकृत लोगोचे थाटात अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला अभिनेते रितेश देशमुख, अभिनेत्री नेहा पेंडसे, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, श्रीपाद आष्टीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

यावेळी बोलताना ॲड. शेलार म्हणाले की, राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून गौरविले आहे. आस्था, श्रद्धा, निष्ठा आणि परंपरेची सांगड घालणारा हा उत्सव केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक स्वरूपापुरता मर्यादित नसून सामाजिक आणि राष्ट्रीय विचारांची प्रभावी अभिव्यक्ती करणारे माध्यम आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू केलेली ही लोकचळवळ आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. घराघरांत साजरा होणारा गणेशोत्सव आणि सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून होणारे आयोजन यामुळे या उत्सवाची परंपरा पुढे नेली जात असल्याचेही शेलार यांनी नमूद केले.



‘Bappa.org’च्या माध्यमातून जगभरातील भाविक जोडणार

‘Bappa.org’ हा डिजिटल मंच गणेशोत्सवाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. या माध्यमातून देश-विदेशातील घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या डिजिटल माध्यमातून जगभरातील गणेशभक्तांना महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये, परंपरा, लोककला आणि सामाजिक उपक्रम जगभरातील भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या मंचाचा उपयोग होईल, असा विश्वास ॲड. शेलार यांनी व्यक्त केला.

१२ फुटी मोदक चित्ररथ ठरणार आकर्षण

या कार्यक्रमात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी साकारलेला तब्बल १२ फुटी भव्य मोदकाचा फिरता चित्ररथही सादर करण्यात आला. या चित्ररथामध्ये गणरायाची प्रतिमा, लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेशी संबंधित विविध कलात्मक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

हा भव्य चित्ररथ वर्षभर राज्यातील विविध भागांत फिरविण्यात येणार आहे. त्यातून महाराष्ट्र गणेश उत्सव राज्य महोत्सवाची व्याप्ती वाढविण्यासोबतच लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि गणेशोत्सवाशी संबंधित वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देश-विदेशात अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याबरोबरच या उत्सवाला जागतिक सांस्कृतिक वारशाच्या पटलावर स्थान मिळवून देण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना आगामी काळात आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Ashish Shelar’s major announcement; launch of ‘this’ initiative.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात