राज्यात 2.80 लाख कोटींच्या मेट्रो प्रकल्पांना वेग; मुंबई, पुणे आणि नागपुरात 683 किमीचे मेट्रो जाळे उभारणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांची कालमर्यादा निश्चित करून नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर आणि मुंबई महानगर प्रदेशातील शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी मेट्रो प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे भविष्यातील नागरी विकासालाही मोठी चालना मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारले जात आहे. सध्या राज्यातील 174 किलोमीटरचे मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी खुले झाले असून, 291 किलोमीटर मार्गांवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे.



याशिवाय 130 किलोमीटर लांबीचे मार्ग मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत, तर 87.15 किलोमीटर मार्गांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहेत.
राज्यात एकूण 2 लाख 80 हजार 755 कोटी रुपयांचे मेट्रो प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा 27 हजार 216 कोटी रुपये, तर राज्य सरकारचा थेट हिस्सा 50 हजार 250 कोटी रुपये आहे.

एमएमआरडीए, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नियोजन प्राधिकरणांच्या माध्यमातून 75 हजार 729 कोटी रुपयांहून अधिक निधीचे नियोजन केले जाणार आहे. उर्वरित निधी शासन हमीवरील कर्जातून उभारण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेशात 428.89 किलोमीटर, पुणे महानगर प्रदेशात 169.45 किलोमीटर आणि नागपूर महानगर प्रदेशात 85.20 किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क विकसित करण्यात येत आहे.

राज्यातील कार्यान्वित, निर्माणाधीन आणि प्रस्तावित मेट्रो मार्गांची एकत्रित लांबी 683.53 किलोमीटर इतकी आहे.राज्य सर

कारने मेट्रो प्रकल्पांसाठी वर्षनिहाय नियोजन केले आहे. चालू वर्षात 87 किलोमीटरचे मार्ग आणि 56 स्थानके उभारण्याचे नियोजन आहे. तर 2029-30 पर्यंत नियोजित प्रकल्पांपैकी 302 किलोमीटर मार्ग आणि 161 स्थानके पूर्ण करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू आहे.

बैठकीत मुंबई महानगर प्रदेशातील मीरा गाव ते गायमुख या मेट्रो-10 मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या मार्गासाठी आवश्यक अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या नियोजन आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यासाठी सुमारे 8 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सुमारे 9.68 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर पाच उन्नत स्थानके असतील.

मेट्रो-10 प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
प्रस्तावित नवीन मेट्रो मार्ग राज्य सरकारने मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि नागपूरमधील नवीन मेट्रो मार्गांचेही नियोजन केले आहे.

यामध्ये अणिक डेपो-वडाळा-गेटवे ऑफ इंडिया हा 17.51 किलोमीटरचा मुंबई मेट्रो-11 मार्ग, हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर-सासवड रोड हा 16.68 किलोमीटरचा मार्ग तसेच बेलापूर-सागर संगम आणि पेंधर-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या 17.09 किलोमीटरच्या नवी मुंबई मेट्रो मार्गांचा समावेश आहे.
नागपूर फेज-2 अंतर्गत कान्हान नदी ते कान्हान सिटी हा 1.45 किलोमीटरचा विस्तारही प्रस्तावित आहे.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा 34.90 किलोमीटरचा मुंबई मेट्रो-8 मार्ग, गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मेट्रो-10 मार्ग आणि शिवाजी चौक ते वसई-विरार हा 25.03 किलोमीटरचा मेट्रो-13 मार्ग प्रस्तावित आहे.

मानपाडा-कल्याण-खुटारी-तळोजा हा 18.40 किलोमीटरचा मेट्रो-12A मार्ग, कफ परेड ते नवी नगर हा 1.40 किलोमीटरचा मेट्रो-3 विस्तार आणि कांजूर ते बदलापूर हा 45.15 किलोमीटरचा मेट्रो-14 मार्गही नियोजनात आहे.

पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यात निगडी-वाकड-नाशिक फाटा-चाकण हा 42 किलोमीटरचा मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

Mumbai Pune Nagpur 683 km metro network to be built devendra fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात