‘आईसोबतच प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या सन्मानासाठी ठामपणे उभा’; काँग्रेसच्या टिप्पणीवर जय पवारांची प्रतिक्रिया

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आलेल्या कथित ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने केली आहे.

या वादावर आता सुनेत्रा पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनीही प्रतिक्रिया देत महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीला शोभणारी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये जय पवार यांनी म्हटले की, सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरण्यात आलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून स्वतःच्या कर्तृत्वाच्या, निष्ठेच्या, कठोर परिश्रमाच्या आणि जनसेवेच्या बळावर समाजात स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला निषेधार्ह आघात आहे.

सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असून, राजकीय मतभेद असू शकतात; मात्र महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्व कमी लेखणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाऊ शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.



राजकारण हे विचार, धोरणे, कामगिरी आणि जनतेच्या विश्वासावर आधारित असावे. वैचारिक संघर्ष करताना सभ्यता, संयम आणि लोकशाही मूल्यांचे भान राखणे आवश्यक असून, महिलांचा अवमान करणाऱ्या शब्दांना लोकशाहीत स्थान नसावे, असे जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

“आज मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो, तिचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे,” अशी भूमिका जय पवार यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Jay Pawar’s reaction to the Congress’s remark.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात