विशेष प्रतिनिधी
मुंबई : दहीहंडीच्या उत्सवाला महाराष्ट्राच्या परंपरेसोबत सामाजिक संदेशाची जोड देत, युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सक्षम समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दहीहंडीच्या उत्सवातून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, दादर आणि घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना भेट देत गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. वरळी येथे राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात त्यांनी प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उत्सवाचा शुभारंभ केला.
यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार राम कदम, आमदार अमित साटम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा’
निरोगी आणि सक्षम महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा. तसेच आपल्या कुटुंबात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून महाराष्ट्राच्या परंपरेचा, तरुणाईच्या साहसाचा आणि संघभावनेचा जागर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मानवी मनोरे म्हणजे संघटित प्रयत्नांचे उदाहरण
घाटकोपर येथील श्रेयस सिनेमा चौकात आमदार राम कदम यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात बोलताना फडणवीस यांनी गोविंदा पथकांतील तरुणांच्या उत्साहाचे आणि जिद्दीचे कौतुक केले.
दहीहंडीतील मानवी मनोरे हे संघटित प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे. मनोऱ्याच्या प्रत्येक थरातील गोविंदाची भूमिका महत्त्वाची असते. तळातील गोविंदांनी दिलेला मजबूत आधार, वरच्या थरातील गोविंदांचा समन्वय आणि सर्वांत वरच्या थरावर पोहोचणाऱ्या बालगोविंदाचे धैर्य यामुळे दहीहंडी यशस्वी होते, असे त्यांनी सांगितले.
घाटकोपरची दहीहंडी मुंबईतील प्रमुख आकर्षणांपैकी एक बनली असून देशाच्या विविध भागांतून गोविंदा पथके येथे सहभागी होतात. त्यामुळे हा उत्सव आता केवळ स्थानिक न राहता व्यापक सांस्कृतिक ओळख निर्माण करणारा सोहळा बनला असल्याचेही फडणवीस म्हणाले.
गोविंदा पथकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
दहीहंडीच्या निमित्ताने युवकांना संघभावना, नेतृत्व, परिश्रम आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा मिळते. मात्र, उंच मानवी मनोरे रचताना गोविंदा पथकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सकाळपासूनच मुंबईतील विविध भागांत दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष आणि उंचच उंच मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
वरळीतील राजयोग प्रतिष्ठानच्या दहीहंडीमधून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ मोहिमेचा संदेश देणारे बॅनरही प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जांबोरी मैदानावरील परिवर्तन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवाला भेट देत गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App