विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या नियामक मंडळाची बैठक पार पडली.
राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी, यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचे वेळापत्रक पूर्वनियोजन करून निश्चित करावे. तसेच प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
राज्य मराठी विकास संस्थेची सर्व वैधानिक अनुपालने पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संस्थेतील गेल्या काही वर्षांपासूनचा प्रशासकीय व वैधानिक अनुशेष दूर झाल्याने संस्थेची प्रशासकीय रचना अधिक सक्षम व परिणामकारक झाली आहे. आता मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि संवर्धन यासाठी ठोस धोरणे राबविण्यावर भर देणे आवश्यक आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही सकारात्मक भूमिकेतून सोडविण्यात येतील.
या बैठकीत सदस्यांनी मराठी भाषा आणि विविध बोलींच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘पेटी वाचनालय’ उपक्रमांचा विस्तार करून आदिवासी व सीमावर्ती भागातील मराठी शाळांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचविणे, झाडीबोली आणि पूर्व विदर्भातील नाट्यपरंपरेच्या जतनासाठी गडचिरोली-वडसा परिसरात नाट्यसंकुल उभारणे, भारुड, गोंधळ, पोवाडा यांसारख्या लोककलांच्या माध्यमातून मराठीचा वारसा जपणे, तसेच बालसाहित्य व बालग्रंथालयांना प्रोत्साहन देण्याबाबत सूचना मांडल्या. या सर्व सूचनांचा सकारात्मकतेने विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी तंजावर येथील मोडी लिपीतील सुमारे 15 लाख ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच लंडन येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामाला गती देण्याबाबतही चर्चा झाली.
यावेळी मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App