भविष्यातील ५० वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांचे नियोजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

पुणे : देशाच्या आर्थिक विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ते, महामार्ग, पूल, बोगदे, जलमार्ग आणि दळणवळणाच्या सुविधा विकसित करताना आजच्या गरजांबरोबरच पुढील २५ ते ५० वर्षांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी सिंबायोसिस च्या प्रधान संचालिका व सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट, डॉ. राजीव येरवडेकर व कुलसचिव डॉ. शेजूळ आदी मान्यवर उपस्थित होते.

गडकरी यांनी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकास यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. ‘नॉलेज टू वेल्थ’ हा भविष्यातील विकासाचा मार्ग असून ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञान, संशोधन, नवकल्पना, उद्योजकता आणि कौशल्य विकासाला चालना देणे आवश्यक आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या निर्मितीचा अनुभव सांगताना गडकरी म्हणाले की, भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन रस्त्यांची क्षमता निश्चित केली पाहिजे. आजच्या समस्यांवर केवळ तात्पुरते उपाय करण्याऐवजी दीर्घकालीन आणि भविष्यवेधी नियोजन गरजेचे आहे. पायाभूत सुविधांमुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना मिळते. वाहतूक खर्च कमी झाल्यास भारतीय उद्योग जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनतील. चांगल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होते, ग्रामीण भाग मुख्य प्रवाहाशी जोडला जातो आणि नवीन उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे त्यांनी सांगितले.



ऑटोमोबाईल उद्योगाच्या वाढीचाही त्यांनी उल्लेख केला. तंत्रज्ञानातील प्रगती, संशोधन, इलेक्ट्रिक वाहने, पर्यायी इंधन आणि जैवइंधनामुळे भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाचा विस्तार होत असून त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि निर्यातीला चालना मिळत असल्याचे गडकरी म्हणाले.

तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांची गुणवत्ता तपासणे, ड्रोन, एआय, लिडार आणि उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने दोष आधीच ओळखणे आणि ‘रिपेअर आफ्टर फेल्युअर’ऐवजी ‘प्रेडिक्ट बिफोर फेल्युअर’ या पद्धतीने देखभाल करणे आवश्यक आहे. ‘नॉलेज विथ एथिक्स’ आवश्यक असून ज्ञानासोबत प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, गुणवत्ता आणि मूल्ये जपली पाहिजेत. शॉर्टकटने दीर्घकाळ यश मिळत नाही, असा संदेशही त्यांनी तरुणांना दिला. विकासासोबत पर्यावरणाचे संरक्षण आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात सुमारे ६० हजार कोटी रुपयांची कामे – पुण्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांवरही त्यांनी भाष्य केले. पुण्यात सुमारे ६० हजार कोटी रुपयांची कामे पुढील काळात सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगत या प्रकल्पांसाठी नावीन्यपूर्ण वित्तीय मॉडेलचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Plan Infrastructure With the Next 50 Years in Mind: Nitin Gadkari

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात