एफडीएच्या कारवाईनंतर मंत्रालय उपहारगृह कात टाकणार; नूतनीकरणावर 3 कोटींचा खर्च

विशेष प्रतिनिधी

मुंबई :राज्याच्या प्रशासकीय कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील उपहारगृहाच्या तपासणीत अन्न आणि औषध प्रशासनाला अस्वच्छता आढळून आल्यानंतर राज्य सरकारने उपहारगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्य इमारतीतील उपहारगृह आणि विस्तारित इमारतीमधील चौरस आहारगृहाच्या नूतनीकरणावर 3 कोटीहून अधिक खर्च होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी या खर्चाला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रालयातील उपहारगृहाची तपासणी केली. त्यावेळी अन्नसुरक्षेसंदर्भातील बाबींची पूर्तता होत नसल्याचे आणि स्वच्छता पाळली जात नसल्याचे आढळून आले होते. तपासणीत स्वयंपाकाच्या ठिकाणी माशा आढळल्या होत्या. तसेच स्वयंपाकगृहात अस्वच्छता आणि पाणी साचल्याचे आढळले होते. स्वच्छतेबाबत मंत्रालय उपहारगृहाची अनास्था समोर आल्याने खळबळ उडाली होती.



या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रालय उपहारगृहातील खानपानसेवा सुधारण्यावर आणि स्वच्छता राखण्यावर भर दिला आहे. उपहारगृहाच्या आधुनिकीकरणासाठी नागपूर शासकीय तंत्रनिकेतन कार्यालयातील विभागप्रमुख डॉ. प्रशांत विरखरे यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार उपहारगृह नूतनीकरणांतर्गत संरचनात्मक दुरुस्ती, फरशी, भिंतीवर फरशा बसविणे, स्वच्छ आणि धुण्यायोग्य पृष्ठभाग तयार करणे, स्वयंपाकघरातील धूर कमी करण्यासाठी यांत्रिक एक्झॉस्ट प्रणाली बसवणे, भांडी धुण्यासाठी पुरेसे सिंक, माशा प्रतिबंधक जाळी बसवणे, हात धुण्याची आणि गणवेश स्वच्छता मानकांचे पालन आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.

दरम्यान, मंत्रालय उपहारगृहाच्या नूतनीकरणासाठी 38 लाख 42 हजार, तर चौरस आहारगृहाच्या नूतनीकरणाकरिता 26 लाख 53 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही उपहारगृहातील विद्युतविषयक कामावर एकूण २ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

Mantralaya Canteen Set for ₹3-Crore Revamp After FDA Action

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात