विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना नक्षलवादाच्या मुद्द्यावरून मोठा इशारा दिला. सशस्त्र नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला असला, तरी ‘दिमागी नक्षलवादी’ अजूनही संधीच्या शोधात आहेत, असा दावा मोदींनी केला. अशा शक्तींना ओळखून त्यांना वेगळं पाडण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी तरुण पिढीला विकसित भारताच्या निर्मितीच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचे आवाहन केले.
मोदी म्हणाले की, सरकारने नक्षलवाद संपवण्याचा संकल्प केला होता. आज नक्षलमुक्त झालेल्या भागांमध्ये विकासाचा झेंडा फडकत आहे. मात्र, यामुळे आत्मसंतुष्ट न होता सतर्क राहण्याची गरज आहे.
Gadchiroli: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई; गुन्हे दाखल अन् आश्रमशाळेची मान्यता रद्द!
‘दिमागी नक्षलवादी’ समाजाची दिशाभूल करत असल्याचा दावा
पंतप्रधानांनी सशस्त्र नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाला असला, तरी विचारांच्या माध्यमातून समाजात हिंसा आणि अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
अशा ‘दिमागी नक्षलवाद्यांना’ ओळखून त्यांना वेगळं पाडलं पाहिजे आणि त्यांच्याकडून तरुणांची दिशाभूल होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मोदी म्हणाले. देशातील युवकांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वापरून त्यांना विकसित राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी करून घेण्यावर त्यांनी भर दिला.
तरुणांसाठी AI प्रशिक्षणाची मोठी घोषणा
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींनी युवकांसाठी महत्त्वाच्या घोषणाही केल्या. येत्या वर्षात 1 कोटी तरुणांना AI कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी मोफत ऑनलाइन कोचिंगचे नेटवर्क उभारण्याची घोषणाही करण्यात आली.
‘2047 पर्यंत विकसित भारत’ हेच लक्ष्य
भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचे असल्याचे मोदींनी पुन्हा स्पष्ट केले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ योजनाच नव्हे, तर देशाची कार्यसंस्कृती आणि विचार करण्याची पद्धतही बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या 5-7 दशकांत जे साध्य झाले नाही, ते पुढील 5-7 वर्षांत साध्य करण्याचा वेग भारताने पकडला पाहिजे, असा संदेश मोदींनी दिला.
‘आता लहान स्वप्नं पुरेशी नाहीत’
मोदींनी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पावरही जोर दिला. इतर देशांवर अवलंबून राहून भारताची क्षमता वाढणार नाही. स्वस्त आणि सहज उपलब्ध वस्तू परदेशातून मिळत असल्या, तरी देशाने स्वतःच्या उत्पादन क्षमता आणि कौशल्यांमध्ये वाढ केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
“लहान स्वप्नं आता पुरेशी नाहीत; मोठी स्वप्नं पाहिली पाहिजेत,” असा संदेश देत मोदींनी मोठी स्वप्नं विचारांचा विस्तार करतात आणि दृढ संकल्प अडचणींवर मात करण्याची ताकद देतात, असे स्पष्ट केले.
महिला आरक्षणावरही राजकीय पक्षांना आवाहन
पंतप्रधानांनी लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व मिळण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. महिलांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महिला आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात यंदा लाल किल्ल्यावर प्रथमच ‘वंदे मातरम्’चे गायन झाले. तिरंगा फडकावल्यानंतर राष्ट्रगीत आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App