विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण अर्थात SIR वरून निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधकांकडून टीका सुरू असतानाच ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘ज्ञानेश कुमार हे भारताचे शत्रू आहेत’, असा थेट आरोप दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केला आहे.
दीपके यांनी मतदार यादीतील नावांच्या वगळण्याच्या मुद्द्यावरूनही प्रश्न उपस्थित केले. Indian Expressच्या तपासणी अहवालाचा संदर्भ देत त्यांनी SIRच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे ड्राफ्ट मतदार याद्यांतून बाहेर पडल्याचा दावा केला. या अहवालानुसार, देशातील ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR प्रक्रियेदरम्यान १३ कोटींपेक्षा अधिक नावे ड्राफ्ट मतदार याद्यांतून बाहेर पडली आहेत. मात्र, यातील सर्व नावे कायमची वगळली गेली आहेत, असा सरसकट अर्थ काढता येत नाही; दावे आणि हरकतींच्या प्रक्रियेत काही नावे पुन्हा समाविष्ट होऊ शकतात.
‘निवडणूक घेत नाहीत, स्क्रिप्टिंग करतात’
अभिजीत दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि विरोधी पक्षांच्या मतांमधील फरक केवळ दोन टक्के असल्याचा दावा करत, SIRमधील मतदारांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप
ज्ञानेश कुमार निवडणुका घेत नसून निवडणुकीची ‘स्क्रिप्टिंग’ करत असल्याचा आरोपही दीपके यांनी केला. दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी Special Intensive Revisionचा उल्लेख ‘विशेष सखोल हेराफेरी’ असा केला.
हे आरोप दीपके यांचे राजकीय मत आहेत. त्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांचे १४ आक्षेप
दरम्यान, Indian Expressच्या तपासणी अहवालामुळे निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांचा मुद्दाही चर्चेत आला आहे. अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले. हे आक्षेप मतदारांची नोंदणी, नावे वगळणे व पुन्हा समाविष्ट करणे, Form 6 मधील बदल आणि मतदार यादीच्या डेटाबेसच्या व्यवस्थापनासह SIRशी संबंधित मुद्द्यांवर होते.
अहवालानुसार, काही आक्षेपांमध्ये संबंधित निर्णय ‘अनधिकृत’ आणि ‘बेकायदेशीर’ असल्याचा दावा करण्यात आला होता. मतदार यादीच्या डेटाबेसचा प्रवेश दिल्लीतील केंद्रीय पातळीवर केंद्रीकृत करण्याबाबतही दोन्ही आयुक्तांनी चिंता व्यक्त केली होती. या संदर्भातील काही पत्रव्यवहार कॅबिनेट सचिवांपर्यंत पोहोचल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आयोगाची भूमिका काय?
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने Indian Expressच्या अहवालातील आक्षेपांचे अस्तित्व, त्यांची तारीख किंवा मजकूर नाकारलेला नसला, तरी SIRसह महत्त्वाचे निर्णय पूर्ण आयोगाने एकमताने घेतले, अशी भूमिका मांडली आहे. आयोगाच्या मते, संबंधित नोंदी या निर्णय प्रक्रियेतील सूचनांचा भाग होत्या.
त्यामुळे एका बाजूला दोन निवडणूक आयुक्तांनी काही निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याचा अहवाल समोर आला आहे, तर दुसरीकडे आयोगाने महत्त्वाचे निर्णय एकमताने झाल्याचे म्हटले आहे.
SIRवरून राजकीय वातावरण तापले
SIRच्या प्रक्रियेवरून गेल्या काही काळापासून विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता Indian Expressच्या अहवालानंतर हा वाद आणखी तीव्र झाला आहे. काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर आयोगाने आपल्या प्रक्रियेचे समर्थन केले आहे.
दरम्यान, अभिजीत दीपके यांच्यासह कॉकरोच जनता पार्टीकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे SIRचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App