‘चाकणला वाचवायचं असेल तर एकच उपाय…’; आदित्य ठाकरेंनी सांगितलं तुकाराम मुंढेंचं नाव!

विशेष प्रतिनिधी

पुणे : चाकण एमआयडीसीतील खड्डे, खराब रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. चाकण परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, “एक चांगला अधिकारी द्या, हे सगळे सुधारेल. तुकाराम मुंढे यांच्यासारखा अधिकारी इथे द्या,” अशी मागणी केली. Tukaram Mundhe

चाकण दौऱ्यात नागरिक, वाहनचालक आणि उद्योजकांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर परिसरातील विविध समस्यांचा पाढा वाचला. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, त्याचा परिणाम आरोग्यावरही होत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.

‘सत्तेतील आमदाराचेही ऐकले जात नाही’

प्रशासनाच्या कामकाजावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “इथे सत्तेतल्या आमदाराचेही ऐकले जात नाही. अनेक लोकांनी त्यांच्या अडचणी मला सांगितल्या. ट्रॅफिकची समस्या आहे आणि त्याचा आरोग्यावरही परिणाम होत आहे.”

चाकणमधील काही पायाभूत प्रकल्पांची अवस्था अवघ्या वर्षभरातच खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राजकीय नेत्यांचा दौरा निश्चित झाल्यानंतरच काही ठिकाणी रस्त्यांची डागडुजी केली जाते, असा टोलाही त्यांनी प्रशासनाला लगावला.



‘२० उद्योग बाहेर जाण्याच्या मार्गावर’

चाकण एमआयडीसीतील उद्योजकांना वीज, पाणी, रस्ते आणि वाहतुकीसारख्या मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचा दावा ठाकरे यांनी केला. या परिस्थितीमुळे काही उद्योग स्थलांतराचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

चाकण परिसरातील सुमारे २० कंपन्या स्थलांतराचा विचार करत असल्याचे वृत्त असून, त्यामुळे जवळपास दोन हजार कामगारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा या प्रमुख अडचणी असल्याचे संबंधित उद्योगांकडून सांगण्यात येत आहे.

“उद्योजक सांगत आहेत की त्यांना सुविधा मिळत नाहीत. वीज, पाणी आणि रस्ते चांगले नाहीत. या परिसरातून २० उद्योग बाहेर जाण्याच्या मार्गावर आहेत,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्यावरही टीका

उद्योगमंत्री उदय सामंत रविवारी, १६ ऑगस्ट रोजी चाकणमधील उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक घेणार आहेत. या बैठकीत रस्ते, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणार आहे.

मात्र, या दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली. “उद्योगमंत्री येत आहेत, पण कामाच्या दिवशी या. मोठा ताफा घेऊन येऊ नका. सामान्य माणूस आणि उद्योजक रोज ज्या परिस्थितीतून जातात, ती स्वतः अनुभवा,” असे ते म्हणाले.

‘तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी द्या’

चाकणमधील विविध सरकारी यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप करत ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे उदाहरण दिले.

“आपण सगळे आज बघतोय. एक चांगला अधिकारी द्या, हे सगळे सुधारेल. तुकाराम मुंढे यांच्यासारखा चांगला अधिकारी द्या,” असे ठाकरे म्हणाले.

सध्या तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी अन्नसुरक्षा नियमांची अंमलबजावणी आणि कारवाई केली जात आहे.

‘खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांचं काय?’

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंचा मुद्दाही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी, “सरकारकडे खेळात प्रथम आलेल्यांना अधिक निधी दिला जातो, मात्र रस्ते आणि खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना काय?” असा सवाल केला.

दरम्यान, चाकणमधील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावरून विरोधकांचा सरकारवरील दबाव वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही संभाव्य उद्योग स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Aditya Thackeray told the name of Tukaram Mundhe!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात