बीडमध्ये मुंडे बंधू-भगिनी एकत्र; धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ दोन मागण्यांनी वाढवली उत्सुकता!

विशेष प्रतिनिधी

बीड : परळी येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळ्यात मुंडे बंधू-भगिनी एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात आमदार धनंजय मुंडे यांनी दोन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. त्यापैकी बारामतीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी तत्काळ मान्य केली. तर परळीतील महाविद्यालयाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

कार्यक्रमाला कृषीप्रधान महाराष्ट्रात पशुपालन हे शेतीला पूरक आणि महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. विशेषतः शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मराठवाड्यात पशुधनाच्या विकासासाठी अशा शैक्षणिक संस्थांची मोठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

धनंजय मुंडेंची भावनिक मागणी

आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी भावनिक शब्दांत दोन्ही महाविद्यालयांच्या नामकरणाची मागणी केली.

“जड अंतःकरणाने माझी मागणी आहे. बारामतीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला स्वर्गीय अजितदादांचे आणि परळीतील महाविद्यालयाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.

परळी आणि परिसराला कृषी व पशुधन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र बनवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. वैद्यनाथाच्या सान्निध्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय, तर सोमेश्वराच्या सान्निध्यात कृषी महाविद्यालय उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.



पंकजा मुंडेंकडून एक मागणी लगेच मान्य

धनंजय मुंडे यांच्या मागणीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवार यांचे नाव देण्याची घोषणा केली.

“अजितदादांचा विकासरथ आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. ते केवळ घोषणा करत नव्हते, तर त्या प्रत्यक्षात उतरवत होते,” असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

अजित पवार यांनी घोषणा केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत राज्य मंत्रिमंडळात या दोन्ही महाविद्यालयांना मंजुरी दिली होती, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले. “दादांनी ही बहिणीला दिलेली भेट होती,” असे म्हणताना त्या भावूक झाल्या.

‘गोपीनाथ मुंडेंचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते’

परळीतील महाविद्यालयाला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याच्या मागणीवर सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली.

“आमदार धनंजय मुंडे यांनी येथील महाविद्यालयासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा आग्रह केला आहे. ही मागणी नक्कीच मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते,” असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

या महाविद्यालयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच परळी तालुक्याच्या विकासाला या संस्थेमुळे आणखी चालना मिळेल, असेही त्या म्हणाल्या.

“नोकरी मागणारा युवक नव्हे, तर स्टार्टअप सुरू करणारा युवक या महाविद्यालयातून घडवायचा आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

‘दादांचा विकासरथ पुढे न्यायचा’

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कामे मार्गी लावली होती. सुरू केलेली विकासकामे पूर्ण करून त्यांचा विकासरथ पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

वैद्यनाथ मंदिर परिसराचा विकास, पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक संस्थांमुळे परळीला नवी ओळख मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांची उपस्थिती आपल्यासाठी विशेष असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

सुनेत्रा पवारांकडून वैद्यनाथाचे दर्शन

कार्यक्रमानंतर सुनेत्रा पवार यांनी परळी येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी वैद्यनाथ मंदिरात रुद्राभिषेक आणि महाआरती केली. यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

Munde siblings together in Beed.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात