रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! १५ ऑगस्टनंतर ‘हा’ नियम मोडला तर परवाना होणार निलंबित?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅबचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांशी व्यवहार करण्याइतपत मराठी भाषेचे ज्ञान असणे आता अनिवार्य करण्यात आले असून, मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेली मुदत १५ ऑगस्ट २०२६ रोजी संपणार आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये ‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६’ अंतर्गत बदल केले आहेत. त्यानुसार प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या चालकांसाठी ‘working knowledge of Marathi language’ म्हणजेच व्यावहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. ही अट रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या ॲप-आधारित मोटार कॅबच्या चालकांनाही लागू आहे.

मराठी नसेल तर कारवाई होणार

सुधारित नियमांनुसार चालकाकडे आवश्यक व्यावहारिक मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळल्यास संबंधित परवाना प्राधिकरण कारवाई करू शकते. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक वाहन चालविण्याची अधिकृतता जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास ही अधिकृतता रद्द केली जाऊ शकते.

परमिटधारकांनाही मराठीची अट

ही अट केवळ वाहनचालकांपुरती मर्यादित नाही. सुधारित नियमांनुसार संबंधित परमिटधारकालाही व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर कॅबच्या परमिटचे नूतनीकरण करताना परमिटधारकाला समाधानकारक स्तरावर मराठीचे ज्ञान असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.



एक लाखांहून अधिक चालकांचे प्रशिक्षण पूर्ण

राज्य सरकारने १ मेपासून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियान’ सुरू केले आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करता यावा, यासाठी आवश्यक मराठी शिकविणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, अभियान सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत एक लाखांहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालकांसह ॲप-आधारित कॅब चालकांनाही १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे अभियान मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

१५ ऑगस्टनंतर आरटीओची नजर

चालकांना मराठी शिकण्यासाठी सरकारने यापूर्वी पुरेसा वेळ दिला आहे. मात्र, १५ ऑगस्टनंतर कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही, असे परिवहनमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनानंतर आरटीओ स्तरावर तपासणीला वेग येण्याची शक्यता आहे.

प्रवाशांशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ करण्यासाठी स्थानिक भाषेचे व्यावहारिक ज्ञान आवश्यक असल्याची भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे. સુધारित नियमांमुळे मराठीच्या अटीबाबतची संदिग्धता दूर होऊन राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करता येईल, असा सरकारचा दावा आहे.

Action against auto-rickshaw and taxi drivers who do not know Marathi; possibility of license suspension

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात