विशेष प्रतिनिधी
पुणे : चाकण औद्योगिक परिसरातील सततची वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा, पाणी आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांना कंटाळून चाकणमधील २० कंपन्यांनी खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.या कंपन्यांमध्ये सुमारे दोन हजार कामगार कार्यरत असून, स्थलांतराबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती कंपनी मालकांनी दिली.
चाकणमधील कंपन्यांच्या मालक आणि संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी कुणाल कड, दिलीप बटवाल, शंतनु कुलकर्णी, जयदेव अक्कलकोटे आणि धनंजय शेडबाळे उपस्थित होते.
“वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आम्ही मुख्यमंत्र्यांना तीन वेळा ई-मेल पाठवले. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आमची अवस्था आयसीयूमधील रुग्णासारखी झाली आहे. वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी आणि वीजपुरवठ्याच्या समस्या आहेत. चालण्यासाठीही व्यवस्थित रस्ते नाहीत. त्यामुळे खंडाळा एमआयडीसीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे,” असे कंपनी प्रतिनिधींनी सांगितले.
चाकण एमआयडीसीमध्ये सुमारे ७५० लघुउद्योग असून त्यातून दरवर्षी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केला. मात्र अपुऱ्या सुविधांमुळे जवळपास २०० कंपन्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी ते चाकण, विशेषतः आंबेठाण चौकापर्यंतच्या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करण्यात आला. सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हे अंतर पार करण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.
“कंपन्या चाकणमधून बाहेर जात नाहीत, असा मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचा दावा चुकीचा आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न अपुरे आहेत. बैठका होतात, आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात सरकारी यंत्रणांचा प्रतिसाद निराशाजनक आहे,” असा आरोपही उद्योजकांनी केला.
दरम्यान, चाकण आणि तळेगाव औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्यांबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही दखल घेतली आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, चाकण येथे ३,२६३ हेक्टर तर तळेगाव येथे ६७५ हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहती विकसित करण्यात आल्या आहेत.
या परिसरात आणि लगतच्या भागात वाहतूक कोंडीची समस्या असल्याचे एमआयडीसीने मान्य केले आहे. विविध शासकीय यंत्रणांकडून रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. अलीकडील पावसामुळे पाणी साचणे, निचरा न होणे आणि त्यामुळे निर्माण झालेले खड्डे यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढल्याचे महामंडळाने नमूद केले.
या समस्यांवरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी दुपारी १ वाजता संबंधित शासकीय विभागांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App