विशेष प्रतिनिधी
दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पुन्हा एकदा अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रं सुनेत्रा पवार यांच्या हातात आली असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी आणि मतभेदही चर्चेत आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं होती. मात्र, त्यांच्या नावांसमोर कोणतंही पद नमूद करण्यात आले नव्हते. यामुळे पक्षातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगली होती.
याच पार्श्वभूमीवर आता पक्षातील पदाधिकारी निवडीमध्ये पार्थ पवार यांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष, महाराष्ट्र युवती आणि विद्यार्थी अध्यक्षपदाच्या निवडींनंतर पार्थ पवार यांनी आता मुंबई अध्यक्षपदाच्या निवडीकडे लक्ष केंद्रित केल्याचं बोललं जात आहे.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर मागील दोन वर्षांपासून मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे. आता या पदावर झिशान सिद्दिकी यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, झिशान सिद्दिकी हे पार्थ पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांची मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यास पक्षातील संघटनात्मक निर्णयांवर पार्थ पवार यांचा प्रभाव आणखी वाढणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
एकीकडे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी संबंधित पदांबाबत चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे तरुण नेतृत्वाला महत्त्व दिलं जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पार्थ पवार यांचा वाढता प्रभाव राष्ट्रवादीतील काही बड्या नेत्यांसाठी राजकीय धक्का ठरणार का? हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App