विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची राज्य मंत्रिमंडळाने दखल घेत संबंधित आश्रमशाळेची शासकीय मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आश्रमशाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणाप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत आश्रमशाळा प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर धानोरा पोलिसांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भास्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह बाल न्याय अधिनियमांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा उपस्थित
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गडचिरोलीतील या घटनेचा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थिनींच्या मृत्यूची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आश्रमशाळेची शासकीय मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले.
यासोबतच राज्यातील सर्व शासकीय आदिवासी आश्रमशाळांची व्यापक तपासणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, केवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या किंवा सहज पोहोचता येणाऱ्या आश्रमशाळांची तपासणी न करता दुर्गम आणि ग्रामीण भागातील आश्रमशाळांचीही प्रत्यक्ष पाहणी करा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
नेमकी घटना कशी घडली?
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरे येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनी जेवण झाल्यानंतर झोपल्या होत्या. रात्री साधारण दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास वसतिगृहात सर्पदंशाची घटना घडली. एकूण सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याचे समोर आले.
घटना लक्षात येताच संबंधित विद्यार्थिनींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य तीन विद्यार्थिनींवर सध्या उपचार सुरू आहेत.
चार सदस्यीय समितीकडून चौकशी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीनंतर आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
चौकशी अहवालाच्या आधारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या फिर्यादीवरून १२ ऑगस्टच्या पहाटे धानोरा पोलीस ठाण्यात आश्रमशाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळण्याची व्यवस्था याबाबत प्रशासनाकडून अधिक काटेकोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
गडचिरोलीतील घटनेनंतर आता राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळांची तपासणी केली जाणार असल्याने संबंधित संस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि निष्काळजीपणा समोर येणार का, याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App