विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. घाटकोपर परिसरातील अशोकनगर भागात पहाटे सुमारे ३ वाजता दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, मुंबई महापालिका, एनडीआरएफ आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. Mumbai Landslide
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर परिसरात ही दरड कोसळली. सुरुवातीला चार ते पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर काही अहवालांमध्ये हा आकडा सहापर्यंत असल्याचे सांगण्यात आले.
#WATCH | Maharashtra: Landslide occurred at Gaushiya Chawl, Chirag Nagar, near Rathod Medical in Kurla, at around 3:48 am. Three to four people are suspected to be trapped. Rescue operation underway. pic.twitter.com/uLeHolcD70 — ANI (@ANI) August 12, 2026
#WATCH | Maharashtra: Landslide occurred at Gaushiya Chawl, Chirag Nagar, near Rathod Medical in Kurla, at around 3:48 am. Three to four people are suspected to be trapped. Rescue operation underway. pic.twitter.com/uLeHolcD70
— ANI (@ANI) August 12, 2026
दोघांचा मृत्यू, दोघे जखमी
या दुर्घटनेत साहिल अन्सारी (२८) आणि मोहम्मद समीर (१४) यांचा मृत्यू झाला. दोघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तर सोहेल अन्सारी (१८) आणि मोहम्मद अन्सारी (१४) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
NDRF, BMCकडून युद्धपातळीवर बचावकार्य
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत. दरड कोसळलेल्या ठिकाणी ढिगारा हटवून त्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
डीसीपी गणेश शिंदे यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली. पोलीस दलासह BMC, NDRF आणि इतर संबंधित यंत्रणांची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.
मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनीही घटनास्थळी पोहोचून बचाव आणि शोधकार्याचा आढावा घेतला.
मुंबईत काही तासांत दोन मोठ्या दुर्घटना
दरड कोसळण्याच्या या दुर्घटनेपूर्वीच मुंबईतील विलेपार्ले परिसरात भीषण आगीची घटना घडली होती. मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता शांता भवन या १२ मजली इमारतीच्या ११व्या मजल्यावरील दोन घरांना आग लागली.
या आगीत अडीच वर्षांचा अबीर आणि २३ वर्षीय अंकिता यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यामध्ये दोन अग्निशमन दलाच्या जवानांचाही समावेश आहे.
मुंबईत एकाच रात्री घडलेल्या या दोन दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरड दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, यासाठी बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App