विशेष प्रतिनिधी
नागपूर: शहरातील बहुप्रतीक्षित इंदोरा चौक ते दिघोरी चौक उड्डाणपुलाचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. सुमारे 8.9 किलोमीटर लांबीचा हा नागपूरमधील सर्वात लांब उड्डाणपूल असून, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उभारलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे ₹998 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हा मार्ग उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडतो आणि शहरातील अनेक गर्दीच्या चौकांना सिग्नलमुक्त पर्याय उपलब्ध करून देणार आहे.लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उड्डाणपुलामुळे नागपूरकरांचा मोठा वेळ वाचणार असल्याचे सांगितले.
“पूर्वी या मार्गावर प्रवास करण्यासाठी जवळपास 50 मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ लागत होता. आता हा प्रवास 10 ते 12 मिनिटांत करता येईल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा जवळपास 40 ते 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. इंधनाची बचत होईल आणि प्रदूषणही कमी होईल,” असे फडणवीस यांनी सांगितले.
हा उड्डाणपूल इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना असल्याचेही त्यांनी म्हटले. उत्तर नागपूरपासून दक्षिण नागपूरपर्यंत मध्यवर्ती भागांना जोडणारी महत्त्वाची कनेक्टिव्हिटी यामुळे निर्माण झाली असून नागपूरमध्ये उड्डाणपूल, मेट्रो आणि रस्त्यांचे एकात्मिक नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
इंदोरा-दिघोरी उड्डाणपूल कमाल चौक, रेशीमबाग, सक्करदरा, भांडे प्लॉट आणि दिघोरी नाका परिसराला जोडतो. या मार्गावरील गर्दीच्या चौकांवर वाहनांना वारंवार थांबावे लागत असल्याने प्रवासाचा कालावधी वाढत होता. नवीन उड्डाणपुलामुळे पीक अवर्समधील प्रवासाचा कालावधी जवळपास एका तासावरून सुमारे 15 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पात सक्करदरा येथील विद्यमान उड्डाणपूलही नव्या कॉरिडॉरमध्ये जोडण्यात आला आहे. कमाल चौक ते रेशीमबाग आणि भांडे प्लॉट ते दिघोरी नाका असे प्रमुख उन्नत मार्ग या प्रकल्पाचा भाग आहेत. अशोक चौक येथे पाच दिशांना जोडणारी विशेष उन्नत रचना उभारण्यात आली आहे.
उड्डाणपुलाच्या बांधकामात Ultra High Performance Fibre Reinforced Concrete (UHPFRC) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे दोन पिलरमधील अधिक लांब स्पॅन उभारणे शक्य झाले आणि आवश्यक आधारस्तंभांची संख्या कमी करता आली, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. डागा रुग्णालयासह महत्त्वाच्या ठिकाणी चढ-उतारासाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण मार्गाचा वापर न करणाऱ्या वाहनांनाही मध्यवर्ती भागातून उड्डाणपुलावर प्रवेश किंवा बाहेर पडणे शक्य होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाला डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरणावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून, त्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला आहे.
नवीन उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर उत्तर आणि दक्षिण नागपूरमधील वाहतूक अधिक वेगवान होईल आणि प्रमुख चौकांवरील कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App