मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई; परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित, सातत्याने नियमभंग केल्यास कायमचा रद्द

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित मोटार कॅब चालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान आता अधिक स्पष्टपणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करत ‘Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026’ लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित अधिकृतता निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना प्रवाशांशी प्रभावी संवाद साधता यावा, यासाठी मराठीचे व्यवहारिक ज्ञान आवश्यक आहे. यापूर्वी या नियमाच्या अंमलबजावणीत काही संदिग्धता होती. ती दूर करण्यासाठी नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

मराठी येत नसेल तर तीन महिन्यांपर्यंत परवाना निलंबित

नव्या तरतुदीनुसार, संबंधित चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसल्याचे आढळल्यास परवाना प्राधिकरणाला लेखी कारणे नोंदवून कारवाई करता येणार आहे. अशा चालकाच्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील संबंधित अधिकृतता जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत निलंबित करता येईल.

यानंतरही चालकाकडून नियमांचे सातत्याने उल्लंघन होत राहिल्यास त्याच्या लायसन्सवरील संबंधित अधिकृतता कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.



ॲप-आधारित कॅब चालकांनाही नियम लागू

नियम २२ मध्ये बदल करून ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबच्या अधिकृत चालकांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. अशा चालकाकडे मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे बंधनकारक राहणार आहे.

याशिवाय, परमिटधारकांसाठीही मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. नियम ७८ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार संबंधित परमिटधारकाकडे मराठीचे व्यवहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे.

परमिट नूतनीकरणासाठीही मराठीची अट

ॲप-आधारित इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या मोटार कॅबचे परमिट नूतनीकरण करतानाही परमिटधारकाकडे मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असणे आवश्यक करण्यात आले आहे. हे ज्ञान संबंधित प्राधिकरणाला समाधानकारक वाटणे आवश्यक असेल.

‘मराठी शिकणार नाही’ म्हणणाऱ्यांवर सरनाईकांचा इशारा

प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मराठी न येणाऱ्या चालकांना यापूर्वी मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात आला होता. सरकारच्या आवाहनानंतर अनेक चालकांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली आणि काहींनी मराठीचे ज्ञानही मिळवले. मात्र, अजूनही काही चालकांकडून ‘मराठी शिकणार नाही’ अशा प्रकारची भूमिका घेतली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

“मग्रुरी मोडून काढण्यासाठीच या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे,” अशी भूमिका सरनाईक यांनी व्यक्त केली.

‘नवा कायदा’ नव्हे, मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा

दरम्यान, या निर्णयाला ‘महाराष्ट्र मोटार वाहन कायदा-२०२६’ असे संबोधणे अचूक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे बदल महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आले असून त्यांना Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 असे म्हटले आहे.

या सुधारणांमुळे रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालक तसेच परमिटधारकांसाठी व्यवहारिक मराठीची अट अधिक स्पष्ट झाली असून, नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात