विशेष प्रतिनिधी
बारामती : कोणतीही निवडणूक गावकी-भावकीची नसते, हा अजितदादा पवारांचा विचार लक्षात ठेवून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करावे. संस्थेची प्रगती आणि दादांनी उभा केलेला वारसा पुढे नेणे हेच आपले ध्येय असले पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होळ येथे शनिवारी (ता. ५) आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या. त्या पुढे म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी सोमेश्वर कारखाना आर्थिक अडचणींच्या काळातून जात होता. त्यावेळी अजितदादांनी याच ठिकाणी सभा घेऊन कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
कारखाना कर्जमुक्त करून दाखवू, त्यानंतरच निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या दूरदृष्टी आणि शिस्तीतून कारखान्याला सक्षम करण्याचे स्वप्न साकार झाले असून, त्यासाठी संचालक मंडळ आणि सभासदांचे अभिनंदन करणे आवश्यक आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. आज सोमेश्वर हा केवळ साखर निर्माण करणारा कारखाना राहिलेला नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संस्था आहे.
चांगला दर देणारा कारखाना म्हणून सोमेश्वरची ओळख निर्माण झाली आहे. साखर उद्योग हा ग्रामीण अर्थकारणाचा कणा असून बदलत्या परिस्थितीत उद्योगासमोरील आव्हाने लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतीमध्ये एआयचा वापर वाढविण्याची गरज आहे. अजितदादांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण ठेवत आधुनिक शेतीवर भर दिला होता. त्यांच्या विचारातूनच पुढील वाटचाल करू, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.
एक हजार उमेदवारी अर्ज आले….
सोमेश्वरच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागणारे सुमारे एक हजार अर्ज आपल्याकडे आले असल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांनी नाराज न होता पक्ष आणि संस्थेच्या हितासाठी काम करावे. ‘आपण तर जिंकलोच आहोत,’ असा विश्वास व्यक्त करत दादांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
खरे मालक ऊस उत्पादक शेतकरी…
सोमेश्वर कारखाना कोणत्याही एका व्यक्तीचा नसून ऊस उत्पादक शेतकरी हेच कारखान्याचे खरे मालक आहेत. कारखाना भविष्यात आणखी सक्षम करण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी समजून काम करण्याची गरज असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App