– ऐतिहासिक लाल महाल चौकात तरुणाईचा जनसागर उसळला Punit Balan
– ढोल-ताशा, हलगीसह पारंपरिक वाद्यांचा गजर
– शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत फोडली दहीहंडी
प्रतिनिधी
पुणे : ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा मंगलमय गजर, हलगीच्या पारंपरिक वादनावर थिरकणारी तरुणाई, उसळलेला जनसागर आणि काळजाचा ठोका चुकविणारे मानवी मनोरे अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुनीत बालन ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डीजेमुक्त संयुक्त दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत संयुक्त दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. सलग दुसऱ्या वर्षी डीजेमुक्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून पुनीत बालन ग्रुपने यानिमित्ताने एक नवा आदर्श निर्माण केला.
पुण्यातील ३१ सार्वजनिक गणेश मंडळांनी या संयुक्त दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी गतवर्षी महाराष्ट्रातील पहिल्या डीजेमुक्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत झाले. यंदा पुण्यात डीजेच्या वापरावरून वातावरण तापले असतानाही पुनीत बालन यांनी डीजेमुक्त दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्याची ठाम भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेला ३१ गणेश मंडळांनी साथ देत संयुक्त दहीहंडीत सहभाग नोंदविला.
प्रभात बँडच्या सुमधुर वादनाने दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर श्रीमंत पेशवे गणेश मंदिर तसेच लाल महाल येथे माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. मानवंदना, रमणबाग, गजर प्रतिष्ठान, शिवाज्ञा ढोल, शिवयोद्धा मर्दानी आखाडा, आवर्तन, समर्थ आणि शिवमुद्रा पथकांच्या जोरदार वादनाने संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला. उपस्थित तरुणाईने ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला.
शिवाज्ञा पथकाने जत्रा यात्रेतील बगाड आणि श्रीनाथ बाबांची पालखी याचे सादरीकरण करत भंडाऱ्याची उधळण केली. वारकऱ्यांच्या पखवाज वादनाने वातावरण भक्तिमय झाले, तर हलगीच्या दमदार वादनाने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील ऐतिहासिक लाल महाल चौकात आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेली दहीहंडी, विद्युत रोषणाई आणि त्यावर करण्यात आलेली कोल्ड फायरची आतषबाजी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या दहीहंडीला २१ हून अधिक गोविंदा पथकांनी पाच ते सात थर रचत सलामी दिली.
दहीहंडीच्या सलामीसाठी सुरुवातीला महिलांच्या शिवकन्या गोविंदा पथकाने सहभाग घेतला. त्यानंतर कसबा पुणे, म्हसोबा दहीहंडी संघ, पंढरीनाथ सेवा मंडळ, पुणेश्वर कसबा पेठ, गणेश मित्र मंडळ कसबा पेठ, राष्ट्र प्रथम कसबा पेठ, भोईराज संघ, मुंबईचे आम्ही आमचे राजे आणि शिवतेज संघ यांसह अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
रात्री पावणेदहा वाजता शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत ऐतिहासिक दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. या संघाने १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस आणि मानाची ट्रॉफी पटकावली.
या दहीहंडी उत्सवाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. तसेच परदेशी पर्यटकांनीही उत्सवात सहभाग घेतला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App