विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस हायकमांडने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत महाराष्ट्राच्या प्रभारीपदी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रासह पंजाब, आसाम, गुजरात, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या सहा राज्यांमध्ये प्रभारी बदलले आहेत. हे बदल तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्राची जबाबदारी यापूर्वी ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांच्याकडे होती. त्यांच्या जागी आता डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सत्ताबदलानंतर चेन्निथला यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याने महाराष्ट्रासाठी नवीन प्रभारी नियुक्त होण्याची शक्यता गेल्या काही महिन्यांपासून व्यक्त केली जात होती. Dr Sirivella Prasad
डॉ. सिरिवेल्ला प्रसाद हे काँग्रेसमधील अनुभवी संघटनात्मक नेते असून त्यांनी यापूर्वी विविध राज्यांमध्ये पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे. काँग्रेसच्या उपलब्ध संघटनात्मक नोंदींनुसार ते अलीकडे झारखंडसाठी एआयसीसी सचिव म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांच्याकडे तमिळनाडूसह अन्य राज्यांतील संघटनात्मक जबाबदाऱ्याही होत्या.
प्रसाद यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली आहे. त्यांच्या २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी हैदराबाद विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर आंध्र प्रदेशातील ओंगोल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना ८,१३९ मते मिळाली होती.
महाराष्ट्रात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविणे, प्रदेश काँग्रेस आणि केंद्रीय नेतृत्वामध्ये समन्वय राखणे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढील राजकीय लढायांसाठी संघटना मजबूत करण्याची जबाबदारी आता प्रसाद यांच्यावर असेल.
काँग्रेसने राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पंजाबचे एआयसीसी सरचिटणीस प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांनी भूपेश बघेल यांची जागा घेतली आहे.
पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. राज्य काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून अंतर्गत मतभेद आणि गटबाजीची चर्चा सुरू असून पक्षाला एकत्र ठेवण्याची मोठी जबाबदारी पायलट यांच्यावर असेल.पायलट यांच्याकडे यापूर्वी छत्तीसगडची जबाबदारी होती.
पंजाबची जबाबदारी सोपवल्यानंतर माजी छत्तीसगड मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची आसामचे एआयसीसी सरचिटणीस प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आसामचे यापूर्वीचे प्रभारी जितेंद्र सिंह यांची जागा घेतील.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याकडे गुजरातची जबाबदारी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे असलेली कर्नाटकची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. गुजरातची जबाबदारी यापूर्वी मुकुल वासनिक यांच्याकडे होती. वासनिक हे मात्र एआयसीसी सरचिटणीस म्हणून कायम राहणार आहेत.
छत्तीसगड, आंध्र प्रदेशातही बदल
सचिन पायलट पंजाबमध्ये गेल्यानंतर सुखदेव भगत यांची छत्तीसगडच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पी. व्ही. मोहन यांच्याकडे आंध्र प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशची जबाबदारी यापूर्वी खासदार मणिकम टागोर यांच्याकडे होती. काँग्रेसने या फेरबदलाची घोषणा करताना जितेंद्र सिंह, रमेश चेन्निथला आणि मणिकम टागोर यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App