वृत्तसंस्था
मुंबई : Mumbai Police मुंबईतील भायखळा परिसरात मोहर्रमच्या जुलूस दरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुलूसमध्ये सामील झालेल्या नागरिकांना गुपचूप विषारी कॅप्सूल वाटून मोठ्या प्रमाणावर जीवानिशी मारण्याचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुण्यात राहणाऱ्या फैयाज प्रेमजी या संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल १४ हजार ९०० विषारी कॅप्सूल आणि ५० किलो घातक रसायन जप्त केले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईतील एक फार मोठी दुर्घटना टळली आहे.Mumbai Police
मोहर्रमच्या जुलूसमध्ये एक व्यक्ती लोकांना काही गोळ्या (कॅप्सूल) वाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, एका नागरिकाने ही कॅप्सूल खाल्ल्यानंतर त्याला अचानक तीव्र पोटदुखी, अस्वस्थता आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. पहाटे ४ च्या सुमारास ही माहिती मिळताच भायखळा पोलिस आणि डीसीपी जयंत मीना यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.Mumbai Police
सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या गोळ्या केवळ ‘पेनकिलर’ (वेदनाशामक) असल्याचे त्याने सांगितले. मात्र, पोलिसांनी जेव्हा त्याची कसून चौकशी केली आणि त्याच्या ठिकाणावर छापा टाकला, तेव्हा समोर आलेले सत्य पाहून पोलिसही चक्रावून गेले.
प्रत्येक कॅप्सूलमध्ये १ ग्रॅम विष
डीसीपी जयंत मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मोहर्रमच्या जुलूसला टार्गेट करण्यासाठी हा कट रचला होता. आरोपी फैयाजने जुलूसमधील हजारो लोकांना लक्ष्य करण्यासाठी तब्बल ३० हजार कॅप्सूल तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. सुदैवाने, त्यातील बहुतांश गोळ्या वाटण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले. आरोपीच्या ताब्यातून उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे अत्यंत घातक रसायन ‘झिंक फॉस्फाईड’ तब्बल ५० किलो जप्त करण्यात आले आहे.
फैयाजने आणलेल्या रिकाम्या कॅप्सूलमध्ये प्रत्येकी १-१ ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरले होते, जे मानवी शरीरासाठी अत्यंत प्राणघातक ठरू शकते. आरोपी कोणत्याही वैध परवान्याशिवाय किंवा वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनशिवाय या गोळ्यांचे बेकायदेशीर वाटप करत होता.
आरोपीचा इराक-इराण दौरा; पोलिस सर्व अँगलने तपास करणार
धक्कादायक बाब म्हणजे, मूळचा पुण्याचा असलेला आणि रंगाचा व्यवसाय करणारा आरोपी फैयाज प्रेमजी हा २०२५ मध्ये इराण आणि इराक येथे जाऊन आला होता. त्याचा हा परदेश दौरा आणि मुंबईतील या घातपाताचा कट यांचा काही संबंध आहे का? तसेच यामागे त्याची वैयक्तिक विकृती आहे की त्याला काही आंतरराष्ट्रीय किंवा दहशतवादी संघटनांकडून चिथावणी मिळाली होती? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
मोठी त्रासदी टळली – पोलिस
डीसीपी जयंत मीना म्हणाले, “आरोपीचा कट खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना हानी पोहोचवण्याचा होता. आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत. पोलिसांनी वेळेत कारवाई केल्यामुळे खूप मोठी जीवितहानी आणि त्रासदी टळली आहे.”
झिंक फॉस्फाईड किती धोकादायक? त्याचा काय परिणाम होतो?
झिंक फॉस्फाईडचा वापर प्रामुख्याने उंदीर मारण्यासाठी केला जातो. हे गडद तपकिरी किंवा काळे रसायन जगातील सर्वात धोकादायक उंदीरनाशकांपैकी एक मानले जाते.
झिंक फॉस्फाईडचा वापर सामान्यतः शेतीत आणि उंदीर मारण्यासाठी केला जातो, परंतु त्याची सहज उपलब्धता आणि उच्च विषारीपणामुळे, सुरक्षा यंत्रणा त्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा अवैध साठा किंवा संशयास्पद खरेदी अत्यंत गांभीर्याने घेतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App