विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘प्रगती’ या राज्यस्तरीय सार्वजनिक आरोग्य सुधारणा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, या प्रकल्पासाठी ४,२५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पाच जिल्ह्यांतील आरोग्य सुविधांमध्ये तब्बल १,६०० खाटांची वाढ होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.Maharashtra
२०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीत ‘प्रगती’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ७० टक्के म्हणजे सुमारे २,९७५ कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून कर्ज, तर ३० टक्के म्हणजे १,२७५ कोटी रुपये राज्य सरकारचा हिस्सा असणार आहे.
कोल्हापूर, नांदेड, पुणे, लातूर आणि नागपूरला मोठा फायदा
‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत कोल्हापूर आणि नांदेड येथे प्रत्येकी ५०० खाटांची नवीन जिल्हा रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. पुण्यात २०० खाटांचे संदर्भसेवा रुग्णालय, तर लातूर आणि नागपूर येथील प्रत्येकी २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे.
या माध्यमातून एकूण १,६०० खाटांची अतिरिक्त क्षमता निर्माण होणार असून, त्यासाठी सुमारे १,५०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. जिल्हास्तरावरच निदान, उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या तृतीयस्तरीय रुग्णालयांवरील रुग्णांचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होणार आहे.
मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगाच्या उपचारांना बळ
प्रकल्पात असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध, तपासणी, निदान आणि उपचाराला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, दीर्घकालीन मूत्रपिंड व फुफ्फुसविकार, पक्षाघात आणि मानसिक आरोग्य यांसारख्या आजारांसाठी आरोग्य सुविधा अधिक सक्षम केल्या जाणार आहेत.
स्तन, गर्भाशयमुख आणि तोंडाच्या कर्करोगाची तपासणी व निदान सुविधा मजबूत करण्यात येणार आहे. कर्करोगाचे लवकर निदान, उपचार आणि रुग्णांचा पुढील पाठपुरावा यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.
डिजिटल आरोग्यसेवांचा विस्तार
‘महाराष्ट्र आरोग्य तंत्रज्ञान अभियान’च्या माध्यमातून राज्यातील आरोग्य सेवांच्या डिजिटल परिवर्तनाला गती दिली जाणार आहे. डिजिटल आरोग्य नोंदी, आरोग्य माहिती प्रणालींचे एकत्रीकरण, टेलिमेडिसिन आणि तंत्रज्ञानाधारित आरोग्य सेवा यांचा विस्तार करण्यात येणार आहे.
आरोग्य सेवांच्या विविध स्तरांमध्ये समन्वय वाढवून रुग्णांना सातत्यपूर्ण उपचार उपलब्ध करून देणे हा प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.
नागरिकांचा आरोग्यावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न
‘प्रगती’ प्रकल्पामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची क्षमता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्याच्या पातळीवरच अधिकाधिक तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना दूरच्या मोठ्या रुग्णालयांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. परिणामी नागरिकांचा आरोग्यावरील स्वखर्च कमी करण्यास आणि सर्वांसाठी सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाला चालना मिळेल, असे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App