विशेष प्रतिनिधी
बीड : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. परळी येथे जनता दरबार सुरू असतानाच त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. Dhananjay Munde
जनता दरबार सुरू असतानाच अचानक त्रास
आमदार धनंजय मुंडे यांचा परळी येथील शासकीय विशेष अतिथीगृहात मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारी ऐकून घेत असतानाच मुंडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.
परिस्थिती लक्षात येताच त्यांना विलंब न करता अतिथीगृहाशेजारी असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली असून पुढील उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
यापूर्वीही प्रकृतीच्या समस्येला सामोरे
धनंजय मुंडे यांना यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘बेल्स पाल्सी’ या चेहऱ्याच्या स्नायूंशी संबंधित आजाराचा सामना करावा लागला होता. या आजारामुळे त्यांच्या बोलण्यावरही काही प्रमाणात परिणाम झाला होता. उपचारानंतर त्यांनी या समस्येतून सावरत पुन्हा सार्वजनिक आणि राजकीय कामकाजाला सुरुवात केली होती.
काही दिवसांपूर्वी एका खासगी कार्यक्रमात त्यांनी आपल्या आरोग्य आणि फिटनेस प्रवासाबद्दलही भाष्य केले होते. नियमित व्यायाम आणि जिमच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते.
‘लोक विचारायचे तब्येत कशी आहे?’
आपल्या फिटनेसबाबत बोलताना धनंजय मुंडे यांनी मिश्किल शैलीत म्हटले होते की, गेल्या दीड वर्षापासून भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून ‘भाऊ, तब्येत कशी आहे?’ असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नाला कंटाळून आपण स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि नियमित जिम करून वजन कमी केल्याचे त्यांनी सांगितले होते.
‘काही काळ माझे सर्वच क्षेत्रात वजन कमी झाले होते. मात्र येणारा काळ आपलाच असल्याने पुढील काळात तंदुरुस्त आणि फिट राहणे आवश्यक आहे,’ असे सूचक विधानही त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळातही चर्चा झाली होती.
बहीण-भाऊ दोघेही मंत्री झाल्याची आठवण
याच कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील एका प्रसंगाची आठवण सांगताना बहीण पंकजा मुंडे यांच्याबाबतही भाष्य केले होते.
‘आम्ही दोघे बहीण-भाऊ एकाच वेळी मंत्री झालो होतो, पण ते चित्र फार काळ टिकले नाही आणि दुर्दैवाने एकाला घरी बसावे लागले,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
मात्र पद आणि प्रतिष्ठेपेक्षा बीडमधील जनतेशी असलेले नाते अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. ‘पंकजा असो, मी असो किंवा आमचे असंख्य कार्यकर्ते असोत; पद आणि प्रतिष्ठेपेक्षा या भागातील जनतेशी असलेले आमचे रक्ताचे नाते अधिक महत्त्वाचे आहे,’ असे त्यांनी म्हटले होते.
प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा
दरम्यान, जनता दरबाराच्या वेळी अचानक प्रकृती बिघडल्यानंतर धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहितीची प्रतीक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App