पाच अन्न परवाने निलंबित, तीन परवाने रद्द; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम तीव्र
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल्स, कॅफे, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि अन्य अन्न आस्थापनांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तपासणी मोहीम सुरू केली आहे. १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत अन्नपदार्थ तयार करणे, हाताळणे, साठवणूक करणे तसेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या आठ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. FDA cracks down
या कारवाईत पाच आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले असून, तीन आस्थापनांचे अन्न परवाने रद्द करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेशी संबंधित नियमांचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली.
कॅफे सुलतानचा परवाना निलंबित
कुर्ला-सांताक्रुझ परिसरातील कॅफे सुलतान येथे अन्नपदार्थ तयार करताना आणि हाताळताना आवश्यक स्वच्छता राखली जात नसल्याचे तपासणीत आढळले. या ठिकाणी शावरमा, बिर्याणी, कबाब, रोल्स यासह विविध फास्ट फूड पदार्थांची विक्री केली जाते. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने या आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
मरोळमधील आस्थापनावरही कारवाई
मरोळ, अंधेरी पूर्व येथील लो फ्रेश फूड प्रायव्हेट लिमिटेड येथे अन्नपदार्थ ठेवण्याच्या आणि हाताळण्याच्या जागेवर स्वच्छतेचा अभाव आढळला. अशा परिस्थितीत अन्नपदार्थ खराब होण्याची किंवा दूषित होण्याची शक्यता असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
कंट्री क्लब, सुरज लामा मोमोजवर कारवाई
अंधेरी पश्चिम येथील कंट्री क्लब येथे अन्नपदार्थ हाताळणे, परिसराची स्वच्छता राखणे आणि अन्नपदार्थांची सुरक्षित साठवणूक याबाबत आवश्यक नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित आस्थापनावर कारवाई करण्यात आली.
अंधेरी पश्चिम येथील सुरज लामा मोमोज येथे मोमोज तसेच इतर खाद्यपदार्थ तयार करताना, हाताळताना आणि साठवताना आवश्यक स्वच्छता पाळली जात नसल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे या आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
सांताक्रुझ पश्चिम येथील कॅफे पाकीझा येथेही अन्नपदार्थांची हाताळणी, साठवणूक आणि परिसराच्या स्वच्छतेबाबत त्रुटी आढळल्या. या कारणास्तव संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
तीन आस्थापनांचे परवाने रद्द
विलेपार्ले एस. व्ही. रोड येथील ब्लिंकिट, विलेपार्ले येथील कोपनहेगन हॉस्पिटॅलिटी आणि वांद्रे पश्चिम येथील ईटक्लब्स या तीन आस्थापनांचीही एफडीएकडून तपासणी करण्यात आली.
या तिन्ही ठिकाणी अन्नपदार्थांची हाताळणी आणि साठवणूक तसेच स्वच्छतेबाबत आवश्यक नियमांचे पालन होत नसल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे तिन्ही आस्थापनांचे अन्न परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.
सणासुदीत तपासणी मोहीम सुरूच राहणार
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी मुंबईतील हॉटेल्स, कॅफे आणि अन्य अन्नविक्री आस्थापनांची तपासणी सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले आहे.
अन्नपदार्थांमध्ये भेसळ, अस्वच्छता किंवा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App