MPSC आंदोलनात राहुल गांधींची एंट्री? ७ किंवा ८ ऑक्टोबरला पुण्यात येण्याची शक्यता; रोहित पवारांचा दावा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा वाढला; सरकारने मागण्या मान्य न केल्यास पुढील आंदोलनाचा इशारा

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कामकाजात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी ७ किंवा ८ ऑक्टोबर रोजी पुण्यात येऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी दिली. Rahul Gandhi

पुण्यात सध्या तीन ठिकाणी एमपीएससी उमेदवारांचे आंदोलन सुरू असून, परीक्षा पद्धतीसह आयोगाच्या कामकाजाशी संबंधित विविध मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत. आगामी परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार की वर्णनात्मक पद्धतीने, याबाबत स्पष्टता द्यावी, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र, आंदोलनातील प्रमुख मागणी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून हटवण्याची आहे.

आयोगाच्या कामकाजातील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मागणीवर सरकारने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

‘सर्व पक्षांचे नेते स्वतःहून आंदोलनस्थळी येत आहेत’

रविवारी एमपीएससी उमेदवारांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या रोहित पवार यांनी विविध राजकीय पक्षांचे नेते विद्यार्थ्यांच्या निमंत्रणाशिवाय आंदोलनस्थळी येत असल्याचे सांगितले.

“आतापर्यंत सर्वच पक्षांतील नेत्यांनी आंदोलनाला भेट दिली आहे. विद्यार्थ्यांकडून कोणत्याही राजकीय नेत्याला निमंत्रण दिले जात नाही. नेते स्वतःहून आंदोलनस्थळी येत आहेत. राज्य सरकारने एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय झाला नाही, तर आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल,” असे रोहित पवार यांनी सांगितले.

सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सरकारला उद्देशून त्यांनी “You are done, Bro!” असा इशारा दिला.

राहुल गांधी ७ किंवा ८ ऑक्टोबरला पुण्यात?

एमपीएससी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या संभाव्य पुणे दौऱ्याबाबतही रोहित पवार यांनी माहिती दिली. राहुल गांधी ७ किंवा ८ ऑक्टोबरपर्यंत पुण्यात येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

“राहुल गांधी ७ किंवा ८ ऑक्टोबरपर्यंत पुण्यात येण्याची शक्यता आहे. युवक काँग्रेसचे नेतेही येथे आंदोलनात सहभागी आहेत. त्यांचा राहुल गांधी यांच्या दिल्लीतील टीमशी संपर्क सुरू आहे,” असे पवार यांनी सांगितले.



राहुल गांधी प्रत्यक्ष पुण्यात येऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यास या आंदोलनाला राजकीय पातळीवर आणखी महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.

रास्ता रोको, मुंबई मोर्चाचा पर्याय?

आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. सरकारकडून अपेक्षित निर्णय न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याच्या पर्यायांवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यामध्ये रास्ता रोको तसेच पुण्यातून मुंबईकडे मोर्चा काढण्यासारखे पर्याय विचाराधीन असल्याची माहिती पवार यांनी दिली.

एमपीएससी सचिवांची प्रतिनियुक्ती सरकारने केली समाप्त

एमपीएससीमधील कथित पेपरफुटी आणि आयोगाच्या कामकाजावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या काही दिवसांत अधिक तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससीचे सचिव महेंद्र उत्तमराव हरपळकर यांची प्रतिनियुक्ती यापूर्वीच समाप्त केली आहे.

एमपीएससी उमेदवारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सरकारने विद्यमान तसेच माजी एमपीएससी अध्यक्ष आणि सदस्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याची भूमिका

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार संविधानाच्या कलम ३१७ अंतर्गत चौकशीची प्रक्रिया राबविण्याची सरकारची भूमिका आहे. संबंधित चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करून अहवाल सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चौकशी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी उमेदवारांच्या आंदोलनावर सरकार आता काय निर्णय घेते आणि राहुल गांधी यांच्या संभाव्य पुणे दौऱ्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा काय ठरते, याकडे राजकीय वर्तुळासह स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi likely to meet MPSC protestors in Pune on October 7 or 8

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात