‘तुकड्या-तुकड्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांची थट्टा करू नका’; हेक्टरी १ लाख आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करा, जरांगेंचा सरकारला इशारा

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळात तुकड्या-तुकड्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांची थट्टा करू नका; हेक्टरी एक लाख रुपये आणि संपूर्ण सरसकट कर्जमाफी तत्काळ जाहीर करा, अन्यथा एका महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे महाआंदोलन उभे राहील,” असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत बाेलताना जरांगे म्हणाले, राज्यात यंदा अस्मानी संकटाने थैमान घातले असून शेतात उभा असलेला खरीप पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मात्र, सरकारचे मंत्री गळ्यात लांबलचक टाय, डोळ्यांवर महागडे चष्मे आणि अत्तराचे घमघमाट मारून दुष्काळी बांधावर येत आहेत. मंत्र्यांचे हे दौरे म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळणे आणि त्यांच्या उरावर नाचण्यासारखे आहे. एका बाजूला शेतकरी उघड्यावर पडलाय आणि दुसऱ्या बाजूला अधिकारी बांधाच्या केवळ अलीकडचा कोपरा जळाला म्हणून तेवढाच पंचनामा करत आहेत.

जरांगे म्हणाले, “अधिकारी पाच एकराच्या शेतात जातात आणि अलीकडचा कोपरा जळाला म्हणून पाच टक्क्यांचा अहवाल देतात. शेतात पाणीच नाही, आभाळात पाऊस नाही, तर पलीकडचा कोपरा जळणार नाही का? फळबागा असोत, ऊस असो, कापूस असो की सोयाबीन; पाणी नसल्याने सगळे जळून खाक होणार आहे. त्यामुळे ‘जळत जळत जाणारे पीक’ असा निकष लावून सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करावा.

50 किलोमीटर अंतरावर चारा छावण्या टाकल्या तर 100 गावांतील शेतकरी जनावरे घेऊन तिथे कसा जाणार? घर उघडे पडल्यावर चोऱ्या होतात, गावात म्हातारे-कोतारे आजारी पडले तर दवाखान्यात न्यायला कोणी उरत नाही. सरकारने प्रत्येक गावातच जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली.



शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची वाट बघू नका. उद्योगपतींचे हजारो कोटी माफ करता, मग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला हात का आखडतात? तीन-तीन वर्षांपासून पीक विम्याचे पैसे कंपन्यांनी अडवून ठेवले आहेत, पूरग्रस्त अनुदाने रखडली आहेत; सरकारने हेक्टरी 1 लाख रुपये मदत दिलीच पाहिजे असे सांगताना जरांगे शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हणाले, दोन दिवस उपाशी राहण्याची वेळ आली तरी खचून जाऊ नका; पण कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नका. शेतकरी मेला की सरकार त्याच्या कुटुंबाला केवळ दीड लाख रुपये देते. नेता पांढरे कपडे घालून चेक देताना 100 फोटो काढतो आणि फोटो चांगला आला का ते बघतो! आपल्या घरात सालगडी ठेवला तरी वर्षाला दोन लाख रुपये द्यावे लागतात; 20 वर्षांत त्याला 40 लाख होतात. मग आपली आयुष्यभराची किंमत फक्त दीड लाख रुपये आहे का? सावध व्हा, निर्भीड व्हा; एकत्र येऊन हक्कासाठी लढा.”
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जरांगे म्हणाले, एमपीएससीच्या अध्यक्षांनी जर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला असेल, तर तो सरकारने तत्काळ स्वीकारायला हवा. देशात काय एकच माणूस हुशार आहे का? दुसरा सक्षम माणूस त्या पदावर बसवा. विद्यार्थ्यांच्या आक्रोशाची दखल घेतली नाही तर मोठा उद्रेक होईल.”

गेल्या 15 दिवसांत माझ्या जवळचे काही लोक फुटले. पण हे सरकारचे षड्यंत्र आहे. मी मॅनेज होत नाही, वाकत नाही म्हणून माझ्याच माणसांना हाताशी धरून माझ्यावर खोटे आरोप करवले जात आहेत. दसऱ्यानंतर बोलण्यासाठी काही विशेष टीम तयार केल्या जात असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. पण मला एकटे पाडता येणार नाही; गावागावातील सामान्य मराठा आणि गरीब जनता माझ्या पाठीशी खंबीर आहे. आंतरवालीच्या काही भगिनींनी आरोप केले असतील, तरी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. शेवटी त्या आपल्या समाजाच्या भगिनी आहेत. माझ्या समर्थकांनी आणि तरुणांनीही कोणत्याही महिलेबद्दल किंवा भगिनीबद्दल बोलताना पूर्ण भान आणि संयम राखला पाहिजे. आज नाही तर उद्या प्रत्येकाला पश्चात्ताप होईल की आपण समाजाच्या आंदोलनाविरुद्ध नको बोलायला होते, असे जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या लढ्याविषयी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आरक्षणाचा लढा अत्यंत क्लिष्ट आणि मोठा आहे. आम्ही सरकारला जाहीरपणे 3 महिन्यांची मुदत दिलेली आहे. मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाने पाटोद्यात दिलेला शब्द सरकार पूर्ण करेल, अशी मला 100 टक्के खात्री आहे. सरकारने मराठा समाजाचा रोष पुन्हा अंगावर घेऊ नये. जर शब्द पाळला नाही, तर पुढील निर्णय समाज एकत्र येऊन घेईल,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil warns of massive farmers’ protest, demands ₹1 lakh per hectare and blanket loan waiver

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात