विशेष प्रतिनिधी
नाशिक : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना 150 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला असून, या मुद्द्यावरून ते गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर टीका करत आहेत. राऊत यांच्या या दाव्यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील येवला येथे माध्यमांशी बोलताना राऊत यांच्या या आरोपांमधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न करत त्यावर आपली भूमिका मांडली आहे.
संजय राऊतांच्या डिलिमिटेशनवरील वक्तव्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, दावे करून काही चालणार नाही. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर पुढे ठेवले पाहिजे. कोणी म्हणत आहे की शंभर कोटी, कोणी म्हणतो दीडशे, कोणी हजार कोटी म्हणतोय, याला काय अर्थ आहे? हे जे असे दावे आहेत याला पुरावा नाही. याबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असा टोला भुजबळ यांनी लगावला आहे.
आनंदराज आंबेडकर यांनी अजित पवार यांच्यासंदर्भात असंवेदनशील विधान केले होते. त्यानंतर माफी मागायचे सोडून त्यांनी सारवासारव केली. आनंदराज आंबेडकर हे सुशिक्षित आहेत. सध्या जे लोक आपल्यामध्ये नाहीत. अतिशय दुर्दैवीरित्या अपघातामध्ये गेलेले आहेत. त्यांच्याबद्दल असे बोलणे बरोबर वाटत नाही. त्यांचे जे विधान आहे ते आमच्या सारख्याला तरी आवडलेले नाही, असे स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
सोने खरेदी करू नका आणि त्यानंतर आता सोन्याचे भाव घसरले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले, बरोबर आहे ना. त्यांनी त्यावेळी सांगितले होते खरेदी करू नका. आज जवळजवळ वीस, पंचवीस हजार रुपयांनी भाव कमी झाले. जी वस्तुस्थिती त्यांनी आपल्यासमोर मांडली यांची बरोबर आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली तर मी येवला येथून उभा राहील असे वक्तव्य आमदार सुहास कांदे यांनी केले. यावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, स्वागत आहे. असे म्हणत त्यांनी कांदे यांच्या मागणीला बगल दिली आहे. तर पंकजा मुंडे यांनी केलेल्या ‘लोकनेत्री’च्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, पंकजा मुंडे यांचे फॅन फॉलोवर्स खूप चांगले आहेत, त्या आज सुद्धा लोकनेत्री आहेतच, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App