विशेष प्रतिनिधी
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने राबविण्यात आलेल्या ऊसशेतीच्या प्रयोगातून एकरी सरासरी १२० टन उत्पादन मिळाले आहे. गोविंद बागेतील मागील १५ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत एकरी तब्बल ६० टनांची वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दुष्काळी परिस्थितीमध्ये उत्पादनात वाढ साधताना एकरी ७५ लाख लिटर पाण्याची बचत करण्यात यश आले आहे.Govindbaug
शेतीतील उत्पादनवाढीसोबतच पाणी, खते आणि पीक संरक्षणावरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने गोविंद बागेत हा प्रयोग राबविण्यात आला. शरद पवार यांच्या पुढाकारातून आणि प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीटी एआय ट्रेनिंग फाउंडेशन, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि विविध साखर कारखान्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. एआय तंत्रज्ञानाच्या आधारे पिकाचे व्यवस्थापन, पाण्याचा वापर आणि खतांचे नियोजन करण्यात आले.Govindbaug
त्याचा सकारात्मक परिणाम उत्पादनावर दिसून आला. एकरी १२० टन उत्पादनाबरोबरच खते आणि पीक संरक्षणावरील खर्चात घट झाली आहे. तसेच साखर उतारा आणि जमिनीच्या आरोग्यातही सुधारणा झाल्याचे या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. या उपक्रमात राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रा. निलेश नलावडे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि एडीटी एआय ट्रेनिंग फाउंडेशनच्या पथकाने महत्त्वपूर्ण काम केले आहे. विद्या प्रतिष्ठानमधील सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड येथील तज्ज्ञांच्या सहकार्याने विकसित झालेल्या या संशोधनाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे नियोजन आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App