विशेष प्रतिनिधी
बारामती : इंदापूर तहसील कार्यालयातील मनमानी कारभार, भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची होणारी अडवणूक यावरून इंदापूरचे तहसीलदार सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. या कारभाराविरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. येत्या २५ नोव्हेंबरला इंदापूर तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील महसूल विभागाच्या कारभाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर आणि युवा नेते प्रवीण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत माने यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आज (ता. १८) मोर्चाची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रदीप गारटकर यांनी म्हणाले, तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत मनमानी आणि अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. प्रशासनाने कायद्यानुसार काम करून सर्वसामान्यांना न्याय देणे अपेक्षित असताना कार्यालयातील कारभार भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, इंदापूरच्या राजकीय इतिहासात प्रथमच सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक संघटना प्रशासकीय कारभाराविरोधात एकत्र आल्याचेही गारटकर यांनी नमूद केले. तसेच यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले, दाखले आणि विविध शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. साधी कामेही वेळेत होत नसून, पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची होणारी ही अडवणूक थांबली पाहिजे, अशी भूमिका माने यांनी मांडली.
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मोर्चा… नगरपालिकेच्या मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा कोणत्याही एका पक्षाचा नसून जनतेच्या हक्कांसाठी असल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शेतकरी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महारुद्र पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास शेळके, शेतकरी संघटनेचे निलेश देवकर, भटके-विमुक्तांचे नेते तानाजी धोत्रे, शिवसेनेचे महादेव सोमवंशी आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App