विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि यंदा पावसातील तूट लक्षात घेता पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. या संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाने आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अर्थात ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत आता चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या निर्णयानुसार वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतासह सार्वजनिक आणि सामुदायिक जमिनीवरही चारा लागवडीची कामे हाती घेता येणार असून, या योजनेत 7 अतिरिक्त चारा पिकांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
पावसातील तूट आणि खरीप-रब्बीतील घटीमुळे चारा टंचाईचा धोका
सन 2026 मध्ये राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि असमान वितरण झाल्याने शेती उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट झाली असून रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रातही घट होण्याचा अंदाज आहे. याचा थेट परिणाम पशुधनासाठी लागणाऱ्या हिरव्या आणि कोरड्या चाऱ्याच्या उपलब्धतेवर होणार आहे. हीच संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन राज्य शासनाने आतापासूनच चारा उत्पादन वाढवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मका, ज्वारीसह 7 अतिरिक्त पिकांचा समावेश आणि बियाण्यांचे नियोजन
मंत्री भरत गोगावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजगार हमी योजनेंतर्गत आता मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लसूणघास (ल्युसर्न), ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट या 7 चारा पिकांच्या लागवडीला विशेष प्रोत्साहन दिले जाईल. कमी पाण्यात वाढणारी, कमी कालावधीत येणारी आणि एकापेक्षा अधिक वेळा कापणी करता येणारी सुधारित वाणे निवडण्यावर भर दिला जाणार आहे. या लागवडीसाठी आवश्यक बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) या संस्थांकडून उपलब्ध करून दिले जाईल. स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार आणि सिंचनाची सोय लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी योग्य वाणांची शिफारस करणार आहेत.
वैयक्तिक शेतासह सामुदायिक जमिनीवर लागवड; मजुरांच्या हाताला मिळणार काम
‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या 375 कामांमधील ‘उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा’ या वर्गात सामुदायिक उपयोगासाठी चारा लागवड आणि वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी चारा लागवड अशा दोन स्वतंत्र कामांचा समावेश करण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायतींमार्फत या कामांची अंमलबजावणी केली जाईल. रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश मजुरांना रोजगार देणे हा असल्याने, मजुरांमार्फत करता येणाऱ्या कामांसाठी यंत्रसामग्री वापरता येणार नाही. तसेच, ज्या क्षेत्रावर एकदा या योजनेतून चारा लागवड केली जाईल, तिथे पुन्हा याच योजनेतून काम घेता येणार नाही. या निर्णयामुळे पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना हक्काचा रोजगार मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App