विशेष प्रतिनिधी
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेले आरोप अत्यंत खालच्या पातळीचे असून, ते केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा प्रकारचे बालिश राजकारण करत आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांचे संबंध भावासारखे अत्यंत जिव्हाळ्याचे होते; त्यामुळे अजितदादांच्या अपघातावरून फडणवीस यांच्यावर असे आरोप करून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मलिन करू नये. या वेळी बावनकुळे यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे अभिनंदनही केले.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विमान प्रवासावरून राजकीय संबंध जोडणे चुकीचे; पवारांकडून संस्कृती शिकावी
रोहित पवार यांच्या आरोपांचा समाचार घेताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संबंधित विमान कंपनीच्या विमानातून महाराष्ट्रातील जवळपास 90 टक्के नेत्यांनी कधी ना कधी प्रवास केला असेल आणि स्वतः रोहित पवार यांनीही अनेकदा त्या कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचे फोटो उपलब्ध आहेत. एखाद्या कंपनीच्या विमानातून प्रवास केला म्हणजे त्या कंपनीशी राजकीय संबंध आहेत, असा निष्कर्ष काढणे पूर्णपणे चुकीचे आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले; हा कार्यक्रम रोहित पवार यांना आवडला नसावा आणि त्याचे महत्त्व कमी करण्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक असे आरोप केले असावेत, अशी शक्यता बावनकुळे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नेहमीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपली असून कधीही प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये केली नाहीत; रोहित पवार यांनी त्यांच्याकडून राजकीय संस्कृती कशी जपावी हे शिकावे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे बावनकुळे यांनी सुनावले.
अजितदादांच्या अपघाताचे सत्य बाहेर आणण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः प्रयत्नशील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांनी एकमेकांना भावाप्रमाणे सांभाळले होते, याची आठवण करून देत बावनकुळे म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघातामागील संपूर्ण सत्य समोर आले पाहिजे आणि या घटनेचा पूर्णपणे पर्दाफाश झाला पाहिजे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रयत्नशील असून त्यांनी काय प्रयत्न केले आहेत याची मला माहिती आहे; मात्र काही गोष्टी सार्वजनिकरीत्या सांगता येत नाहीत. रोहित पवार यांच्या आरोपांमुळे फडणवीस यांच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, उलट जनतेच्या मनात रोहित पवारांची प्रतिमा कमी झाली असून हीच त्यांच्यासाठी मोठी मानहानी आहे. पक्षात कोणी विचारत नसल्यामुळे आणि बाजूला सारले जात असल्यामुळेच शरद पवार गटातून बाहेर पडण्यासाठी ते असे वातावरण तयार करत असावेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
डिलिमिटेशनला सुप्रिया सुळे मदत करत असतील तर त्यांचे अभिनंदन: बावनकुळे
दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. सध्या अनेक लोकसभा मतदारसंघांचे क्षेत्रफळ सुमारे 300 किलोमीटर आणि विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्रफळ 150 किलोमीटरपर्यंत असून काही ठिकाणी लोकसंख्या 40 ते 45 लाखांपर्यंत पोहोचली आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आणि प्रशासन व लोकप्रतिनिधींमधील प्रभावी समन्वयासाठी लोकप्रतिनिधींची संख्या वाढणे व मतदारसंघांची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. त्यामुळे देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या डिलिमिटेशन प्रक्रियेला सुप्रिया सुळे मदत करत असतील, तर आपण त्यांचे नक्कीच अभिनंदन करू, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App