फडणवीसांचा फोटो, ‘मफलर मॅन’ आणि VSR कंपनी! रोहित पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ

विशेष प्रतिनिधी

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या ‘मफलर मॅन’च्या नावाने पोस्टरबाजी सुरू होती, त्या मफलर मॅनचे नाव जाहीर करत रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवला. अजितदादांच्या अपघातास कारणीभूत असलेल्या व्हीएसआर (VSR) एव्हिएशन कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. जर माझे आरोप चुकीचे असतील तर सरकारने याची सखोल तपासणी करावी, असे खुले आव्हान देत आमचे सरकार सत्तेत आल्यावर कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे व्ही. के. सिंह यांचे निकटवर्तीय असल्याचा दावा

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, मी ज्या व्यक्तीचे नाव घेत आहे, त्यांनी अजितदादांचा घातपात केला असे मी म्हणत नाही; परंतु ज्या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला, त्या कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात असल्याचा आम्हाला ठाम संशय आहे. देवेंद्र फडणवीस हे व्ही. के. सिंह यांच्या जयपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमालाही उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे सत्ता आहे, सीआयडी आहे आणि केंद्रातील सीबीआय देखील त्यांचे ऐकू शकते; तरीही अद्याप या प्रकरणाचा तपास का होत नाही, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. काकाला न्याय देऊ शकलो नाही तर गरीबांना काय न्याय देणार, अशी भावनिक साद घालत यासाठी माझे राजकारण धोक्यात आले तरी चालेल, पण मी सत्याचा पाठपुरावा सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या भेटीमुळे दादांचा गाडीचा प्रवास टळला

अजित पवार यांच्या प्रवासाच्या वेळेतील बदलाबाबत मोठा खुलासा करताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन वरिष्ठ नेत्यांवर बोट ठेवले. अजितदादा सुरुवातीला मोटारीने बारामतीला जाणार होते; मात्र त्याच वेळी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा फोन आला आणि त्यांनी भेटायला येत असल्याचे सांगितले. तसेच एका व्यक्तीने फाईलवर सही करायची असल्याचे सांगून दादांना थांबवून ठेवले. या भेटींमुळे दादांचा दौरा पुढे गेला आणि त्यांना नाइलाजाने गाडीचा प्रवास रद्द करून विमानाने जावे लागले, असा दावा रोहित पवार यांनी केला. आज दादांचा पक्ष सत्तेत असूनही त्यांच्याच आमदारांनी केलेली सीबीआय तपासाची मागणी मान्य होत नाही, यावरून त्यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवरही टीका केली.


गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


बारामती पोलिसांचा गुन्हा घेण्यास नकार, व्हीएसआर कंपनीचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचा आरोप

तपासातील दिरंगाईवर बोट ठेवताना रोहित पवार यांनी सांगितले की, घटनेनंतर आम्ही बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो. सुरुवातीला पोलीस गुन्हा नोंदवण्यास तयार होते; परंतु कोणचातरी फोन आल्यानंतर त्यांनी नकार दिला. त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जाऊन झीरो एफआयआर दाखल करावा लागला. हा गुन्हा महाराष्ट्रात सीआयडीकडे वर्ग झाला खरा, पण सीआयडीने तो स्वतंत्र गुन्हा म्हणून न स्वीकारता केवळ जोडपत्र म्हणून स्वीकारला. दुसरीकडे, डीजीसीएकडे (DGCA) अनेक पुरावे देऊनही कारवाई झालेली नाही. व्हीएसआर कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार म्हणाले की, दादांच्या निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत व्ही. के. सिंह यांचा मुलगा रोहित सिंह याने अमेरिकेत 18 कोटींचे घर विकत घेतले आणि ज्याच्याकडून हे घर घेतले तो व त्याचा व्यावसायिक भागीदार मोठ्या ड्रग्ज तस्करीत गुंतलेले आहेत. तसेच व्ही. के. सिंह यांनी 27 कंपन्या आणि कोलकात्यातील एका कंपनीच्या माध्यमातून 868 कोटी रुपये काळ्याचे पांढरे केले, तरीही ईडीकडून कोणतीही चौकशी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

बंगल्याबाहेर काळी जादू आणि 150 कोटींच्या विमानाचा गूढ प्रश्न

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीचा संदर्भ देत रोहित पवार यांनी सांगितले की, अपघाताच्या आदल्या दिवशी आणि त्यानंतरच्या तीन दिवसांत समता पतसंस्थेमध्ये कोट्यवधी रुपये हस्तांतरित करण्यात आले. याच काळात अजितदादांच्या बारामतीतील घराबाहेर काळी जादू करण्यात आल्याचे समोर आले असून यात कोकणातील एका नेत्याचा सहभाग असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, दादांच्या निधनानंतरही राज्य सरकारने व्हीएसआर कंपनीला 168 कोटी रुपये दिले आहेत. शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे नाहीत, पण या कंपनीला निधी दिला जात आहे. या कंपनीच्या ताफ्यातील इतर सर्व विमानांचे मालक व वापरकर्ते समोर आले असले, तरी ‘VT-VSV Legacy 650’ हे 150 कोटींचे विमान नेमके कोणाचे आहे, याचे उत्तर महाराष्ट्रातील त्या संबंधित नेत्याने द्यावे, असे आव्हानही रोहित पवार यांनी दिले आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी केलेले हे सर्व आरोप त्यांचे वैयक्तिक राजकीय दावे असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार, सीआयडी किंवा व्हीएसआर कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Rohit Pawar displays Devendra Fadnavis’s photo as Muffler Man

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात