आंबा-काजू शेतीत AIची एंट्री! ४०० शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प; नितेश राणेंचा मोठा उपक्रम

विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू फळपिकांवर परिणाम झाला आहे. हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासोबतच शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने आंबा-काजू उत्पादकांसाठी AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सिंधुदुर्गच्या शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित बदल घडवून आणणारा ठरेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रायोगिक प्रकल्पाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र आणि एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या माध्यमातून हा दोन वर्षांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील २०० आंबा उत्पादक आणि २०० काजू उत्पादक अशा एकूण ४०० शेतकऱ्यांचा या प्रकल्पात समावेश करण्यात येणार आहे.

‘सिंधुदुर्गातील शेतकरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे राहणार नाहीत’

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि शासन स्तरावर विविध शाश्वत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसमोरील आव्हानांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जगातील अनेक देश शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करीत आहेत. सिंधुदुर्गातील शेतकरीही तंत्रज्ञानाच्या बाबतीत कुठेही मागे राहणार नाहीत, यासाठी जिल्ह्यातील शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे, असे राणे यांनी सांगितले.

शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे. येणाऱ्या पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि AIचा वापर कसा करता येईल, याचाही विचार करण्याची गरज आहे.

जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ४.५० लाख रुपयांचा टप्पा पार करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पारदर्शकपणे राबविला जाईल. शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असेही राणे यांनी सांगितले.



AIच्या मदतीने आंबा-काजू पिकांचे विश्लेषण

प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे शास्त्रज्ञ विवेक भोईटे यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट केले.

तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभरातील कोणत्याही ठिकाणची शेती व्यवस्थापित करणे शक्य होत आहे. उत्पादन वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि सनियंत्रणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. ऊस उत्पादनामध्ये या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा झाला असून, त्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे, असे भोईटे यांनी सांगितले.

आंबा आणि काजू पिकांशी संबंधित विविध प्रकारची माहिती एकत्रित करून AI प्रणालीच्या माध्यमातून तिचे विश्लेषण केले जाणार आहे. त्याआधारे पिकांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या माध्यमातून उत्पादनात वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. कृषक मोबाईल प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मराठी भाषेत सहज समजेल अशा पद्धतीने आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हवामान केंद्रे, मृदा सेन्सर्स आणि IoTचा वापर

या प्रकल्पांतर्गत स्थानिक हवामान केंद्रे, मृदा सेन्सर्स, IoT तंत्रज्ञान, उपग्रह छायाचित्रे, AI आधारित पीक निरीक्षण आणि डिजिटल मॅपिंग यांचा वापर केला जाणार आहे.

तसेच प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे डिजिटल वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात डिजिटल डॅशबोर्डची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांची स्थिती, हवामान आणि मातीशी संबंधित माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘शेतकऱ्यांना लाभदायी ठरणारा उपक्रम’

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी हा प्रकल्प जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना लाभदायी ठरणारा उपक्रम असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध अशासकीय संस्था, प्रगतिशील शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

AI enters mango and cashew farming! ‘Smart farming’ project for 400 farmers; a major initiative by Nitesh Rane.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात